
१० ऑक्टोबरला नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा, 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी उद्या नागपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान हा मोर्चा निघणार आहे.

Published : October 9, 2025 at 4:40 PM IST
नागपूर : १० ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या ओबीसी महामोर्चाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून मोर्चाची सुरुवात होणार आहे. विदर्भातील बहुतांश ओबीसी संघटनांनी या महामोर्चाला समर्थन दिलं असून उद्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव येणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
नागपुरात महामोर्चा : नागपुरात सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भातील ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने नागपूरमध्ये एकवटणार असल्याचा दावा केला जातोय. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आणणारा दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी नागपुरात महामोर्चा काढला जात आहे.
सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चा : प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण हे मिळालेच पाहिजे. मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. मात्र ओबीसीमधून आरक्षण देण्यास मात्र ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. विदर्भातील सकल ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबर रोजी नागपूर इथे महामोर्चाचे आयोजन केले आहे.
ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना : मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयात पात्र हा शब्द वगळण्यात आला, त्यामुळं मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळू शकते. यातून ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. सरकारच्या निर्णयानंतर मराठवाड्यात काही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले. सरकारने शासन निर्णय जारी केला असून यातून ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार आहे. म्हणूनच विदर्भातील सर्व ओबीसी संघटना एकवटल्या आहेत.
जिल्हा स्तरावर बैठका झाल्या आता महामोर्चा : विदर्भातील प्रत्येक जिल्हा ओबीसी संघटनांनी बैठका घेऊन (जीआर) शासन निर्णयला विरोध करण्याचा ठराव केलेला आहे. गेल्या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघटनांनी आक्रोश मोर्चा देखील काढला होता. पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चे निघून या शासन निर्णयाला विरोध करण्यात आला. तसंच पश्चिम विदर्भात यवतमाळ, वाशिम, वर्धा अमरावती, बुलढाणा, अकोला इथे देखील मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी २ सप्टेंबरला शासन निर्णयाला विरोध करणारे मेळावे घेतले. यातूनच महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
ओबीसी समाज गप्प बसणार नाही : विदर्भात सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चा हा राज्य सरकारला इशाराच आहे, सरकारनं ओबीसी समाजाला अजिबात गृहीत धरू नये. एका समाजाच्या दबावाखाली येऊन सरकार जर ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही हा संदेश या मोर्चातून देण्यात येणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
मोर्चा कोणत्या पक्षाचा नाही तर ओबीसींचा : नागपुरात उद्या होणाऱ्या मोर्चासाठी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक येणार आहेत. लोकांनी या मोर्चासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून १० तारखेला विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी समाज नागपुरात एकवटणार आहेत. हा मोर्चा नागपूर इथे यशवंत स्टेडियम इथून सुरू होऊन संविधान चौकात संपणार आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आहे असं ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण जर कोणी हिसकावून घेत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी समाज एकवटला आहे. हा लढा कोणत्याही दुसऱ्या समाजाच्या विरोधात नाही तर ओबीसी हक्कासाठी आहे असं वडेट्टीवार म्हणाले. म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी या मोर्चात सहभागी व्हावे असं आवाहन ओबीसी नेते वडेट्टीवर यांनी केलं.
हेही वाचा -

