पुणे : महात्मा फुले यांच्या आयुष्यावर फुले चित्रपट आज महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र काही संघटनांनी चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्यावर सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांना विचारलं असता ते म्हणाले की, सेन्सर बोर्डाकडून जे काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्याचं पालक करण्यात आलं असून आम्हाला यू सर्टिफिकेट देखील देण्यात आलं आहे. तसेच जे विरोध करत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे की, त्यांनी ट्रेलरवर जाऊ नये संपूर्ण चित्रपट बघावा असं यावेळी अनंत महादेवन म्हणाले.
फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि अभिनेता प्रतीक गांधी यांची पत्रकार परिषद आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
यावेळी दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले की, फुले चित्रपट करण्यासाठी महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्यावरील अनेक पुस्तकांचा अभ्यास करण्यात आला आणि ७ ते ८ तासाचा चित्रपट तयार केला. त्यातून महत्त्वाचा भाग घेत दोन ते सव्वा दोन तासांचा चित्रपट तयार करण्यात आला आहे. फक्त ट्रेलर बघून फुले चित्रपटाला कुणीही विरोध करू नये तसंच कोणाचाही दबाव नसून चित्रपटातील कोणताही सीन कट करण्यात आलेल नाही असं देखील यावेळी महादेवन म्हणाले.
चित्रपटातील अभिनेता प्रतीक गांधीला त्याच्या भूमिकेच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की, भारताचे पहिले सुपर हिरो महात्मा फुले होते. महात्मा फुले यांनी जे काम केलं आहे, त्यावेळी विचार देखील कोणी करू शकत नव्हतं. येत्या २५ तारखेला फुले चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. स्क्रीनवर पहिल्यांदा अश्या महान व्यक्तीची भूमिका मी करत आहे. स्टेजवर तर अनेक लोकांनी भूमिका ही केली आहे आणि थिएटरच्या अनुभवाने खूप मदत या चित्रपटात मला झाली असल्याचं यावेळी प्रतीक गांधी याने सांगितलं.
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रॉडक्शन्स निर्मिती यांच्या माध्यमातून 'फुले' हा हिंदी चित्रपट जगभर येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याच्या प्रेरणादायी जीवनकहाणीला रुपेरी पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, जो आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देतानाच नव्या विचारांची दारे उघडणारा ठरणार आहे.
दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत स्कॅम १९९२' फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयातून या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना नवी ऊर्जा मिळाल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं. 'फुले' हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत नाही, तर त्यामागची तत्त्वं, मूल्यं आणि सामाजिक चळवळींचं महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो केवळ चित्रपट न राहता, एक सांस्कृतिक आणि वैचारिक अनुभव ठरणार आहे, असं यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
हेही वाचा...