पुणे : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता. या सर्व घटनेनंतर भारत सरकारनं पाकिस्तानविरोधात शड्डू ठोकला होता. भारतातून जाण्याचे आदेश भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना दिले होते. भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं जात आहे. असं असताना यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात बेकायदेशीर पाकिस्तानींचं वास्तव्य : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही जवळपास पाच हजार पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली होती. यातील केवळ बोटावर मोजण्याइतकेच लोक हे वैध प्रमाणपत्रासह भारतात राहत होते. यातील हजारो पाकिस्तानी हे बेकायदेशीरपणे राज्यात राहत असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळं या सर्वांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही : "गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करू नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. मात्र, राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक गायब नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. सोमवारपर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल," असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी गायब असल्याच्या विषयावर खुलासा केला.
पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द : "भारतानं अनेक पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. महाराष्ट्रात पाकिस्तानातील नागरिक कुठे-कुठे राहत आहेत? याचं आम्ही मॉनेटरिंग करत आहोत, तपास करत आहोत. यात जे कुणी दिरंगाई करेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पाकिस्तानचा एकही नागरिक या देशात किंवा महाराष्ट्रात राहणार नाही, याची पूर्णपणे आम्ही काळजी घेतोय. त्यांनी तत्काळ भारतातून जावं," असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना इशारा दिला आहे.
हेही वाचा -