सिंधुदुर्ग- गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेतेसुद्धा त्यांच्यावर टीकास्त्र डागत आहेत. मविआच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काळात माजी मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याच्या प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार प्रहार केलाय. नारायण राणे जेवत असताना त्यांना पोलिसांनी घरातून अटक केली होती. त्या घटनेचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांनी आता त्याची परतफेड करण्याची भाषा गुरुवारी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केलीय.
तो क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय : मंत्री राणे म्हणाले की, साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा जो काही क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशी डिलीट करेन. सगळ्यांचा हिशेब होणार असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशारा दिलाय. कारण राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटत नाहीत. एवढं विश्वासाने मी आपल्याला सांगतोय, असंही नितेश राणे म्हणालेत.
ठाकरे यांच्याबद्दल कोकणात एक विधान : खरं तर केंद्रीय मंत्री असताना नारायण राणे यांना 23 ऑगस्ट 2021 रोजी अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोकणात एक विधान केलं होतं. महाडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे म्हणाले होते की, 'स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्य दिन कोणता माहिती नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती', असे विधान नारायण राणेंनी केले होते. त्यानंतर या विधानावरून गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. जेवण करत असतानाच राणेंना पोलिसांनी अटक केली होती.
नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून आता वेगवेगळ्या चर्चा : तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा तो विषय समोर आला आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी आता वेळ जवळ आली आहे, असे सांगत ड्रग्ज विरोधात धडक मोहीम हाती घेणारे आयआरएस समीर वानखेडे यांना साक्षीला ठेवलंय. त्यामुळे हे प्रकरण भविष्यात कोणते वळण घेते हे बघावे लागणार आहे. त्यातच नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नितेश राणेंनी कुणाला इशारा दिला, याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहेत.
हेही वाचा -