शिर्डी : मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीन नीता अंबानी यांनी आपल्या आईसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. रविवारी (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल सामना (IPL 2025) रंगला. यात मुंबईनं यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय मिळवला.
"मॅडम... रोहित को कॅप्टन करो" : मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीण नीता अंबानी या आई पूर्णिमा दलालसह रविवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या आरतीला उपस्थित राहिल्या. साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबीयांचा शाल, साई मूर्ती देऊन सत्कार केला. साई समाधीच्या दर्शनानंतर अंबानी यांनी गुरुस्थान मंदिरात दर्शन घेतलं. गुरुस्थान दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर परिसरात उपस्थित असलेला एक भाविक "मॅडम... रोहित को कॅप्टन करो" असं म्हणाला. त्यावेळी "बाबा की मर्जी है, ओम साई राम" म्हणत त्या हसत-हसत उत्तर देऊन पुढं निघून गेल्या.
साईबाबांचं ध्यान केलं : साईबाबांच्या दर्शनासाठी नीता अंबानी यांची आई पूर्णिमा दलाल आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. नेहमीसारखे त्यांनी यावेळी साईबाबांच्या द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तसेच साईबाबांच्या लेंडीबागमध्ये दिवेही लावले. यावेळी त्यांनी साईबाबांचं ध्यान केलं.
मोबाईलवर पाहिला क्रिकेट सामना : काहीकाळ मंदिर परिसरातील विश्वस्त कक्षात बसून 7.30 वाजता सुरू झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना आपल्या मोबाईलवर पाहिला. मुंबई इंडियन्स विजयी झाल्यानंतर नीता अंबानी या हसत हसत मंदिर परिसराच्या बाहेर पडल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी मंदिर परिसरात नीता अंबानी यांना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या विजयाची घोषणाबाजी केली. त्यावेळी नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावर विजयाचा एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
हेही वाचा -