मुंबई : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध घातल्यानंतर खातेदारांची मोठी कोंडी झाली. २७ फेब्रुवारीपासून आरबीआयनं खातेदारांना २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मंजूरी दिली. त्यानंतर आज बँकेच्या अंधेरी आणि गोरेगाव या शाखांसमोर खातेदारांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या. सध्या "जेवढे पैसे मिळतात, तेवढे काढून घ्या", अशी ग्राहकांची भूमिका आहे. ठेवींच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं विमा योजनेची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली, ती १० लाख रुपयांपर्यंत करण्याची मागणी खातेदार करत आहेत. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटाच्या विरोधात कोणताही तपास सुरू नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
आरबीआयनं घातले न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर १३ फेब्रुवारी रोजी आरबीआयनं निर्बंध घातले. त्यामुळं बँकेच्या खातेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळं खातेदारांनी बँकेसमोर मोठ्या रांगा लावल्या होत्या. आरबीआयनं एक परिपत्रक जारी करुन खातेधारकांना २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली होती. त्याची अंमलजबावणी आजपासून सुरू झाली. मात्र. २५ हजार रुपयांची मर्यादा पुरेसी नाही, अशी भूमिका अनेक ग्राहकांनी घेतली. तर, काही ग्राहकांनी आरबीआयच्या निर्णयाच स्वागत केलं.
आरबीआयनं अचानक निर्बंध घालायला नको होतं : "आरबीआयनं २५ हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी द्यायला हवी होती. लोकांना घर चालवायचं आहे, सोसायटीचा खर्च आहे, वैद्यकीय खर्च आहे. आरबीआयनं २५ हजारांवरून ५० हजारांपर्यंत मर्यादा वाढविण्यास परवानगी दिली पाहिजे. आरबीआयनं वार्षिक पाहणी केल्यानंतर त्याचवेळीच पावलं उचलायला पाहिजे होती. थेट निर्बंध घातल्यानंतर गरजू लोकांना पैशांसाठी वणवण फिरावं लागतं. त्यामुळं आधीच काळजी घ्यायला हवी. २५ हजार रुपयांची मर्यादा खूप कमी आहे. अनेकांच्या बचत खात्यात बरीच रक्कम आहे. तसंच बऱ्याच जणांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. या ठेवींबाबत आरबीआयनं काहीच सांगितल नाही. मुंबईसारख्या ठिकाणी २५ हजार रुपयांचं काही मोल नाही. आठवडाभरात संपून जातील. किमान १ ते दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळायला हवी," असं मत खातेदार अहमद भट यांनी व्यक्त केलं. भट हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांचा घरखर्च मुदत ठेवीच्या व्याजावर अवलंबून आहे.
ज्यांची जास्त रक्कम जमा आहे, त्यांचं काय? : "आरबीआयनं जास्त रक्कम काढण्याची परवानगी द्यायला हवी होती. २५-३० वर्षांपासून बॅकेत माझ खात आहे. आरबीआयनं पैसे काढण्यासाठी २५ हजार रुपयांचीच परवानगी दिली. त्यामुळं पैसे काढण्यासाठी लोकांची मोठी रांग लागली आहे. बँकेनं ऑनलाईन ट्रान्सफरची सुविधा द्यायला हवी. सध्या जेवढे मिळतात, तेवढे पैसे काढून घ्या. पण, ज्यांची जास्त रक्कम जमा आहे, त्यांचे काय? ठेवींच्या विम्याची मर्यादादेखील ५ लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढवावी," अशी मागणी खातेदार अजय मेहता यांनी केली.
प्रिती झिंटाविरोधात कोणताही तपास नाही : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिती झिंटानं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचं सुमारे १८ कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आपण ओव्हरड्राफ्ट सुविधा घेतली होती. त्याची संपूर्ण परतफेड झाल्यंचं प्रिती झिंटानं स्पष्ट केलं. "तिच्याविरोधात कोणताही तपास सुरू झालेला नाही. आम्हाला तिच्याविरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. याशिवाय सध्या सुरू असलेल्या तपासातही तिचा समावेश नाही." असं आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा :