मुंबई- दीर्घकाळापासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग यंदा जूनपर्यंत पूर्ण होणार असून, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. वर्षानुवर्षे खड्डेमय रस्त्यांचा सामना केलेल्या कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलीय. सोमवारी मुंबईतील येथे एका कार्यक्रमात बोलताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सांगितले की, देशभरातील काही टोल बूथ लवकरच काढून टाकले जातील आणि केंद्र सरकार नवीन टोल धोरण आणेल. देशाच्या पायाभूत सुविधांच्या भविष्यावर विश्वास व्यक्त करताना गडकरी म्हणाले की, पुढील दोन वर्षांत भारताची रस्ते अन् पायाभूत सुविधा अमेरिकेपेक्षा चांगली असेल. मुंबई आणि गोवा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गामुळे या ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल आणि कोकण प्रदेशातील विकासाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे, असंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय. दादर परिसरातील अमर हिंद मंडळ या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत मंत्री बोलत होते.
या जूनपर्यंत हा रस्ता 100 टक्के पूर्ण करू : महामार्ग पूर्ण करण्यात येणाऱ्या अनेक आव्हानांवर मात करीत गडकरी यांनी विकासांच्या कामांना मान्यता दिलीय. मुंबई-गोवा महामार्गात अनेक अडचणी होत्या. पण काळजी करू नका, आम्ही या जूनपर्यंत हा रस्ता 100 टक्के पूर्ण करू," असे ते म्हणाले. कायदेशीर वाद आणि भूसंपादनावरील अंतर्गत संघर्ष हे विलंबाचे प्रमुख कारण असल्याचे गडकरी यांनी सांगितले. "भावंडांमध्ये भांडणे, न्यायालयात खटले आणि जमिनीचा मोबदला देण्यात अनंत गुंतागुंत होती. परंतु आता त्या समस्या सोडवल्या गेल्या आहेत आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे," असंही नितीन गडकरींनी सांगितलंय.
नवीन टोल धोरण आणणार : पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत व्यापक चिंता अधोरेखित करताना ते म्हणाले, "दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा महामार्ग हे आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट आहेत. त्यांच्यात अनेक अडचणी येत आहेत. जर मी कोकणाबद्दल खरे बोललो तर लोक ते स्वीकारणार नाहीत. केंद्र सरकार लवकरच नवीन टोल धोरण आणणार आहे. मी आता त्याबद्दल जास्त बोलणार नाही, परंतु येत्या 15 दिवसांत एक नवीन धोरण जाहीर केले जाणार आहे. ते एकदा अंमलात आणल्यानंतर टोलबद्दल कोणालाही तक्रार करण्याचे कारण राहणार नाही," असंही ते म्हणालेत. नवीन प्रणालीमध्ये सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि वाहन नंबर प्लेट ओळख वापरून बँक खात्यांमधून स्वयंचलितपणे वजावट केली जाणार आहे, ज्यामुळे मॅन्युअल टोल वसूल करण्याची आवश्यकता कमी होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा -