नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन या मार्गावरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळं नवी मुंबईमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र सोमवारी पाहायला मिळालं. रस्त्यावर धावणाऱ्या एका चारचाकी गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानं ही खळबळ उडाली. हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा एखाद्या व्यक्तीचा असून त्याचं अपहरण झालं असेल का? असा प्रश्न ही गाडी पाहणाऱ्याला पडला असणार. मात्र, या चारचाकी वाहनाचा व्हिडिओमागील सत्य आता समोर आलं आहे.
दक्ष वाहन चालकाने केला व्हिडिओ : धावत्या चारचाकी वाहनातून बाहेर लटकणारा हात हा मृत शरीराचा आहे किंवा कोणाचे अपहरणं करुन नेण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल ये-जा करणाऱ्या नागरिकांना शंका वाटत होती. त्यामुळं एका दक्ष वाहन चालकानं आपल्या कारमधूनच हात डिक्कीबाहेर लटकत असलेल्या वाहनाचा व्हिडिओ शूट करत याबाबत पोलिसांत तक्रार दिली. हा व्हिडिओ पाहताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. व्हिडिओत दिसणाऱ्या वाहनाच्या क्रमांकावरुन कार आणि कार मालकाचा शोध लावला. त्यानंतर हा प्रकार काय आहे, याचा खुलासा झाला.
पोलीस तपासात समोर आलं सत्य : कारच्या डिक्कीतून बाहेर लटकणारा हात हा कोणत्याही मृतदेहाचा किंवा व्यक्तीचा नसून सदर व्हिडीओ हा लॅपटॉप विक्री बाबतच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आल्याच समोर आलं आहे. सदर व्हिडिओबाबात पोलिसांना मिळताच पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरुन तिचा शोध घेतला. त्यानंतर या कारच्या मालकाकडून सदर प्रकार हा रील बनविणाऱ्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी रील बनवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं. या प्रकरणी पोलिसांनी तरुणांची चौकशी केली. यावेळी रील बनवण्यासाठी डिकीत बसून हात खाली लटकत ठेवला होता, असं मुलांनी पोलिसांना सांगितलं. तसेच हा व्हिडिओ कसा शूट केला याचे व्हिडिओदेखील मुलांनी पोलिसांनी दाखवले.
चालकाविरुद्ध कारवाई : या प्रकारणी चालकाविरूध्द सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवल्याने मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :
सलमान खानला जीवे मारणाऱ्याची धमकी देणारा गुजरातमध्ये सापडला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
बुलढाण्यात भीषण अपघात; एसटी बस-ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू ,१९ जण जखमी
मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना आणणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय