नवी मुंबई: तळोजा परिसरातील देवीचा पाडा येथे अडीच वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह राहत्या घरात सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.२७) समोर आला आहे. या खून प्रकरणाचा उलगडा झाला. शेजाऱ्यानंच मुलीचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे.
काय आहे प्रकार- नवी मुंबईतील तळोजा देवीचा पाडा येथे राहणाऱ्या कुटुंबातील चिमुकली मंगळवारी दुपारी साडेबारानंतर खेळण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र, अचानक ती बेपत्ता झाली. ती हरवल्याची तक्रार कुटुंबीयांनी तळोजा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
घरातच सुटकेसमध्ये आढळला बेपत्ता मुलीचा मृतदेह- बेपत्ता चिमुकली ही मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, आज गुरुवारी तिचा मृतदेह राहत्या घरात बाथरूमवरील पोटमाळ्यावरील सुटकेसमध्ये ठेवल्याचं आढळून आलं. पोटमाळ्यावरून दुर्गंधी येऊ लागल्यानं पाहणी केली असता चिमुकलीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला. हरवलेल्या मुलीचा मृतदेह घरातच आढळल्यानं मुलीच्या आई-वडिलांना धक्का बसला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला. तळोजा पोलिसासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पुढील तपास केला. या घटनेनंतर नवी मुंबई परिमंडळ २ चे उपायुक्त अमित काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपीच्या मुसक्या आवळल्या- पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी घडलेल्या धक्कादायक गुन्ह्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार चिमुकलीच्या कुटुंबीयांचे शेजाऱ्याशी वाद होते. त्याचबरोबर शेजारील व्यक्तीला मोबाईल गेमिंगचादेखील नाद होता. यामध्ये तो बेचाळीस हजार रुपये गमावून बसला. चिमुकलीचं अपहरण करून तिच्या वडिलांकडून खंडणी मागण्याचा आरोपीचा प्लॅन होता. त्यानं चिमुकलीचं अपहरण करून गळा आवळला. अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानं पोलीस तिथे घरी ये-जा करत होते. त्यामुळे आरोपीला चिमुकलीचा मृतदेह बाहेर घेऊन जाणं अशक्य झाले. त्यामुळे मृतदेह सुटकेसमध्ये भरून तिच्याच घरात लपवल्याची आरोपीनं कबुली दिली आहे. या आरोपीला पोलिसांनी मुसक्या आवळून अटक केली आहे.
हेही वाचा-