पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन आज (10 जून) साजरा होणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादीकडून म्हणजेच, शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यातील बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर शरद पवार यांच्याकडून पुण्यातीलच बालगंधर्व रंगमदिर इथं कार्यक्रम होणार आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या साठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आज (10 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन दिनाचा सोहळाही रंगणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात होणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारीदेखील केली आहे.
'प्रवास 26 वर्षांचा, मेळा निष्ठावंतांचा'- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर इथं सकाळी कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच पक्षातील सर्वच खासदार, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या वर्धापन दिन सोहळ्याला 'प्रवास 26 वर्षांचा, मेळा निष्ठावंतांचा', असं नाव देण्यात आलं आहे.
दोन्ही 'राष्ट्रवादी'कडून शक्ती प्रदर्शन होणार- दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज दुपारी 3 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
- राज्यात होणाऱ्या आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मोठं महत्व आलं आहे. दोन्ही पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षाकडून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार-अजित पवार काय बोलणार?- राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मागच्या वर्षी शिर्डी येथे वर्धापन दिन सोहळा साजरा केला होता. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अहिल्यानगर इथं वर्धापन दिनाचा सोहळा पार पडला होता. आता यावर्षी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत आज वर्धापन दिनाच्या दिवशी दोन्ही गट एकत्र येण्याविषयी काका-पुतण्या काय बोलणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसणं टाळलं- सोमवारी अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथल्या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसणं टाळलं. कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची आसनं एकमेकांच्या शेजारी होती. पण, अजित पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपली नेम प्लेट बदलली. त्या जागी सहकार मंत्री बाबसाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवली होती.
हेही वाचा-