सातारा - नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीनं सोनिया आणि राहुल गांधी यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे. 'काँग्रेसचे सत्य, भाजपाचे खोटे', या नावाने सोमवारपासून (२१ एप्रिल) ही मोहीम सुरू झाली आहे. देशातील ५७ शहरांमध्ये ५७ पत्रकार परिषदांमधून काँग्रेसचे नेते भाजपाचा खोटेपणा समोर आणणार आहेत.
काँग्रेसकडून नेत्यांची यादी जाहीर : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसकडून देशभरात घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत बाजू मांडण्यासाठी ५५ नेत्यांची नावे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निश्चित केली आहेत. त्यांची यादी काँग्रेसनं जाहीर केली आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सिंग सुरजेवाला, राजीव शुक्ला, अलका लांबा यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
पृथ्वीराज चव्हाण बेळगावमध्ये घेणार पत्रकार परिषद : नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि आघाडीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीत देशभरात पत्रकार परिषदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आजपासून (सोमवार) ही मोहीम सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी बेळगावमधील जिल्हा काँग्रेस कमिटीत पत्रकार परिषद घेणार आहेत.
जाणूनबुजून मालमत्ता जप्त केल्या : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींची नावे कट रचून आरोपपत्रात समाविष्ट केली आहेत. काँग्रेसचं अहमदाबादमध्ये अधिवेशन सुरू असताना ईडीनं जाणूनबुजून नॅशनल हेराल्डच्या मालमत्ता जप्त केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत केला आहे.
हेही वाचा - सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल, काय आहे प्रकरण?