नाशिक- जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकास करण्याच्या नावाखाली बनावट शासन आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंता शैलेजा नलावडेच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेजा नलावडे ही महिला अधिकारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात तत्कालीन कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होती. त्यांनी कार्यालयातील इतरांच्या मदतीनं 4 डिसेंबर 2024 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत शासन निर्णय डीटीएस 2024 पर्यटन 1 चा दिनांक 8 ऑगस्ट 2024 हा बनावट आदेश तयार केला. त्याद्वारे एक कोटी रुपयांची पर्यटनस्थळ पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची भासवून बेकायदेशीरपणे शासकीय दस्तांवर नोंदवून खोटे दस्तावेज तयार केले. त्याची निविदा प्रसिद्ध करून शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करून बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवली.
- कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कार्यकारी अभियंता शैलेजा नलावडे यांच्या विरोधात बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
दोषींवर कठोर कारवाई होईल- शैलेजा नलावडे यांनी केलेला गुन्हा फौजदारी स्वरूपाचा आहे. जिल्हा परिषदेनं त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितलं आहे.
एक कोटींचा अपहार- जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार 2024 -25 मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी बेकायदेशीर पद्धतीनं निविदा प्रक्रिया राबवली. त्यात खोटे शासन निर्णय आहेत. ही निविदा प्रक्रिया राबवून एक कोटीचा अपहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत आम्ही भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचं पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा-