नाशिक- नाशिक रोड येथील देवळाली गाव येथून सातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या तरुणाच्या चालत्या दुचाकीवर झाड कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला. दोघे तरुण कुटुंबात एकुलते एक असून या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड देवळाली गाव येथील मातोश्री रमाई आंबेडकरनगर येथील गौरव आणि सम्यक भोसले हे वीस वर्षीय तरुण १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सातपूर परिसरातील कामगार हॉस्पिटलच्या मागे असलेल्या खासगी कंपनीत रोजंदारीवर कामासाठी जात होते. त्याचवेळेस अचानक या ठिकाणी असलेले जुनाट आणि वाळलेले मोठे झाड मुळासकट उखडून त्यांच्या दुचाकीवर कोसळलं. त्यात एका तरुणाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
झाड कोसळल्यानंतर तरुणांना वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. काहींनी १०८ क्रमांकावर फोन करुनही रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. कामगारांनी खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. ते दोघे तरुण मित्र होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते सोबतच कंपनीत रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
धोकादायक झाडे काढावी- घटनेची माहिती समजताच राजवाडा मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृत युवकांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित डोळे पाणावले.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नाशिक महानगरपालिकेने वेळीच रस्त्यावरील धोकेदायक वृक्ष काढून टाकावे अशी मागणी जोर धरू लागली आहे..
२५० वृक्ष कोसळली- नाशिक शहरामध्ये ११ मे रोजी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे नाशिककरांची दाणादाण उडाली. ५० मिनिटात ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील ३० रस्त्यावर पाणी साचलं होतं. जवळपास २५० वृक्ष कोसळली होती. तर ८० चारचाकी आणि दुचाकींचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्यानं अनेक भागात पाच ते तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
शेतकरी वर्ग हताश- जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका पिकाला बसलाय. जवळपास चार हजार हेक्टरहून अधिक पिकाचं नुकसान झाले आहे. शासनस्तरावर पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. १० मे अखेर झालेल्या नोंदीप्रमाणे जिल्ह्यात जवळपास 4 हजार हेक्टर पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. यात सर्वाधिक नुकसान कांद्याचं झालं आहे. त्याचबरोबर डाळिंब, आंबा, द्राक्ष आणि पालेभाज्यांचेही मोठं नुकसान झालं आहे.
६०० गावातील १४ हजार शेतकऱ्यांचं नुकसान- जिल्हा कृषी विभागाच्या माहितीनुसार १० मे अखेरपर्यंत ६ अवकाळी पावसामुळे ६०० गावातील १४ हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. यात सर्वाधिक नुकसान पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचं झालं आहे. सुरगाणा तालुक्यात ४५०० तर पेठ तालुक्यात ४८०० शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्याला फटका बसू शकतो. जमिनीत सततचा ओलावा असल्यानं कीड वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असं जिल्हा कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी आवाहन केलं आहे.