नाशिक- नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2027 रोजी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यातील पर्वस्नानांच्या तारखा घोषित करण्यासाठी अखेर एक जूनचा मुहूर्त मिळाला आहे.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती 13 आखाड्यांचे 26 प्रतिनिधी आणि नाशिक, त्रंबकेश्वर साधू महंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. पर्वस्नानांच्या तारखा जाहीर होणार असल्यानं खऱ्या अर्थानं नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळ्यास प्रारंभ होणार आहे.
पालकमंत्री नसल्यानं तारखा घोषित करण्यास विलंब- प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडल्यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी आणि नियोजन करण्याकरिता प्रशासनाकडून अनेक बैठकी झाल्या आहेत. मात्र, अद्याप शाहीस्नान आणि पर्वस्नानांच्या तारखा जाहीर झाल्या नव्हत्या. त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या पर्वस्नानाच्या तारखा यापूर्वीच घोषित करण्यात आल्या होत्या. मात्र. नाशिकच्या तारखा घोषित न झाल्यानं साधू महाराजांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. नाशिक जिल्ह्यासाठी पालकमंत्री नसल्यानं शाही स्नानांच्या तारखा घोषित करण्यास विलंब झाला होता.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक- नाशिकमध्ये एक जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात आखाडा परिषदेत समावेश असलेल्या 13 आखाड्यांचे प्रत्येकी दोन असे 26 प्रतिनिधी, नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथी साधू महंत आणि पुरोहित संघाचे प्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत. यात पर्वस्नानांच्या तारखा घोषित केल्या जाणार आहेत. या बैठकीमुळे एका अर्थानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थला प्रारंभ होणार आहे. त्यादृष्टीनं प्रशासनासह साधू महतांच्या नियोजनालादेखील वेग येणार आहे.
काय आहे नाशिक कुंभमेळ्याचं महत्त्व- भारतात दर तीन वर्षांनंतर एकदा या पद्धतीनं बारा वर्षांत नाशिक ( त्र्यंबकेश्वर), प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा धार्मिक उत्सव असून यासाठी कोणालाही औपचारिक निमंत्रण दिलं जात नाही. असे असले तरी करोडो भाविक या सोहळ्याला उत्साहात सहभागी होतात. या कुंभमेळ्यात शाही स्नानाला विशेष महत्व आहे. यावेळी नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य देत नदीची पूजा केली जाते. यावेळी साधू महंत वेगवेगळ्या आखाड्यातून मिरवणूक काढून येत नदीत शाही स्नान करतात. यावेळी साधु-महंतांना सर्व प्रथम शाही स्नान करण्याचा मान दिला जातो.
कधी होतो नाशिकमध्ये कुंभस्थ? सिंह राशिमध्ये जेव्हा गुरू येतो, त्यावेळी नाशिकचे सिंहस्थ कुंभस्नान होत असते. यंदा 31 ऑक्टोबर 2026 ला दुपारी 12.02 वाजता सिंह राशिमध्ये गुरूचं आगमन होत आहे. त्यामुळे 2027 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे पहिले पर्वणी स्नान आहे. 1956 साली याच पद्धतीचा कुंभमेळा आला होता. त्यामुळे यंदाच्या कुंभमेळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नाशिक आणि त्रंबकेश्वर येथे सिहस्थ कुंभमेळा भरत असतो. त्यात नाशिकला वैष्णवाचे स्नान होतात. तर त्र्यंबकेश्वरला शैव लोकांचे स्नान होत असतं, अशी माहिती नाशिक पुरोहित संघाचे समन्वयक प्रतीक शुक्ल यांनी सांगितलं.
हेही वाचा-