शहरात 10 महिन्यात 46 खून, नाशिक पोलिसांकडून जेसीबी मोहीम राबवत टवाळखोरांचे अवैध अड्डे उद्ध्वस्त
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची जेसीबी मोहीम राबवत टवाळखोरांचे अड्डे, अतिक्रमणावर कारवाई करत शहरातील टवाळखोरांच्या अड्ड्यांवर कारवाई केली.

Published : October 9, 2025 at 5:16 PM IST
नाशिक : शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसाआड खून, कोयते घेऊन तोडफोड करणाऱ्या टोळ्यांमुळं शहरात भीतीचं वातावरण आहे. शहरात पसरलेली भाईगिरीची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी जेसीबी मोहीम राबवली आहे. नाशिक पोलिसांनी अतिक्रमण विभागासोबत जेसीबीच्या सहाय्यानं टवाळखोरांचे अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
तरूणाईमध्ये भाईगिरीचा ट्रेंड : नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली असून मागील 10 महिन्यात सर्वाधिक 46 खून झालेत. सर्वाधिक खुनाच्या घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. विशेष म्हणजे खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश सर्वाधिक आहे. शहरात अल्पवयीन मुलांसह तरुणांमध्ये भाईगिरीचा ट्रेंड आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयित आरोपींची राजकीय व्यक्तींशी जवळीक असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटनांमध्ये भाजपाच्या दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्यानं पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलांचा राग अनावर होत असल्यानं आणि थ्रिलसाठी नशा केल्यानं त्यांच्या हातून गंभीर गुन्हे घडत आहेत, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
टवाळखोरांचे अड्डे उद्ध्वस्त : शहरातील पंचवटी, नाशिक रोड, सातपूर, जुने नाशिक या भागातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याची सुरुवात नाशिक रोड आणि पंचवटी परिसरातून करण्यात आली. नाशिक पोलिसांनी पंचवटी भागातील आरटीओ ते मखमलाबाद लिंक रोडवरील बेकायदेशीर टवाळखोरांचे अड्डे, अतिक्रमण, चायनीज, अंडा भुर्जीच्या गाड्या तसंच गुन्हेगारीला खतपाणी घालणारी ठिकाणं उद्ध्वस्त करायला सुरूवात केली. पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळं टवाळखोरांचे धाबे दणाणले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचं सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे.
भाईगिरीची क्रेझ : "शाळेत शिक्षकांनी आणि घरी पालकांनी अल्पवयीन मुलांना वेळीच चांगलं आणि वाईट हे समजून सांगितलं पाहिजे. मोबाईलमुळं अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची क्रेझ वाढत आहे. यामुळं मुलं गुन्हेगारीचे अनुकरण करताना आढळतात. यात व्यसन आणि हिंसक घटनांमुळं तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक जण गुन्हेगारी मार्गाला लागलेत," असं मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितलं.
अवैध बांधकामं उद्ध्वस्त : "आम्ही नाशिक रोड आणि पंचवटी भागात अवैध बांधकामं काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. रस्त्याच्या कडेला असलेलं अवैध बांधकाम, टपऱ्या हटवण्याचं काम सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रम विभागासोबत ही मोहीम राबवली जात आहे. यापुढंही ही मोहीम अशीच सुरू राहील," अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी दिली.
महिनेनिहाय खुनाच्या घटना : जानेवारी 6, फेब्रुवारी 4, मार्च 5, एप्रिल 6, मे 5, जून 5, जुलै 1, ऑगस्ट 3, सप्टेंबर 7, ऑक्टोबर 4. या घटनांमध्ये 41 पुरुष तर 14 महिलांचा समावेश आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत 70 खुनाचे प्रयत्न झालेत.
हेही वाचा :

