नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्हा आहे. यामुळं जिल्ह्यात साक्षरांचं प्रमाण वाढविण्यासाठी शिक्षण विभाग योजनेअंतर्गत उल्हास नवसाक्षरता अभियानांतर्गत तब्बल ३७ हजार ३८४ निरक्षरांनी नोंदणी केली होती. २३ मार्च रोजी जिल्ह्यातील १२२३ केंद्रांवर त्यांच्या पायाभूत साक्षरतेशी संलग्न असलेल्या संख्याज्ञान आणि मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. यासाठी तब्बल ३५ हजार ३०७ परिक्षार्थी उपस्थित होते. राज्यात गडचिरोलीनंतर सर्वाधिक नवसाक्षर नोंदणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे.
नवसाक्षर नोंदणीत राज्यात दुसरा क्रमांक : राज्यात गडचिरोली नंतर नंदुरबार जिल्ह्याची आदिवासी जिल्हा म्हणून ओळख आहे. राज्यात गडचिरोली जिल्हा नवसाक्षरता नोंदणीत पहिल्या क्रमांकावर असून नंदुरबार जिल्हा हा द्वितीय क्रमांकावर आहे. शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नोंदणी ही नंदुरबार जिल्ह्यात झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता वाचन, लेखन आणि संख्याज्ञान विकसित करुन त्यांच्यामध्ये महत्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी केंद्र पुरस्कृत उल्हास नव साक्षरता कार्यक्रमातंर्गत अभियान राबविण्यात आले. यासाठी ३७ हजार ३८४ निरक्षरांची नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये २२ हजार ६६६ महिला तर १४ हजार ७१८ पुरुषांचा समावेश होता. यात २१ हजार ५५५ महिला तर १३ हजार ७५२ पुरुष अशा एकूण ३५ हजार ३०७ परिक्षार्थींनी जिल्ह्यातील १२२३ केंद्रांवर परीक्षा दिली. यात ४४ दिव्यांगांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रांवर शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापकांनी निर्देशित केलेले त्याच शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक परीक्षा केंद्रसंचालक होते.
- साक्षरता अभियानाला प्रतिसाद : केंद्र पुरस्कृत उल्हास नवसाक्षरता कार्यक्रमातंर्गत राबविण्यात येणाऱ्या अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी असलेल्या नवसाक्षरांच्या तुलनेत दुप्पटीनं यंदा नोंदणी झाली होती. गेल्या वर्षी १५ हजार ३८४ परिक्षार्थी होते तर यंदा ३५ हजार ३८४ जणांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर नवसाक्षर नंदुरबार जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यातील नवसाक्षरांची तालुका निहाय आकडेवारी :
- नंदुरबार तालुक्यात २०७ केंद्रांवर ६०४१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.
- नवापूर तालुक्यातील २३२ केंद्रात ७३८३ नवसाक्षरांनी परीक्षा दिली.
- शहादा तालुक्यात १३६ केंद्रात ४६७८ परीक्षार्थी प्रविष्ट झालेत.
- अक्कलकुवा तालुक्यात २५० केंद्रांवर सर्वाधिक नवसाक्षर ७६७४ परीक्षार्थींनी सहभाग नोंदवला.
- तळोदा तालुक्यात ११० केंद्रांवर ४०५३ परीक्षार्थी प्रविष्ट झालेत.
- अतिदुर्गम धडगाव तालुक्यात २८८ केंद्रांवर ५४७८ परीक्षार्थी सहभागी झालेत.
असे जिल्ह्यात एकूण १२२३ केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. यात एकूण ३५३०७ नवसाक्षरांनी चाचणी परीक्षेत आपला सहभाग नोंदवून राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम नोंदवला आहे.
हेही वाचा -