छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - रुग्णालयात गाडी लावणं धोक्याचं झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच सिडको पोलिसांनी सापळा रचून एका दुचाकी चोराला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 26 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हा आरोपी परभणी जिल्ह्यातील असून एका कंपनीत कामाला आहे. प्रत्येक शनिवारी सुट्टीच्या दिवशी तो परभणी येथून संभाजीनगरमध्ये दाखल व्हायचा आणि दुचाकी चोरून त्याच गाडीवर बसून परत जायचा. विशेष म्हणजे गाडीची चोरी रुग्णालयाच्या वाहन तळावरून करायचा. पोलिसांकडे वाढलेल्या तक्रारीनंतर त्यांनी सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
रुग्णालयातून चोरल्या दुचाकी - छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हे शाखेला माहिती मिळाली की एकनाथ महादू मुंडे नावाचा आरोपी हा दुचाकी चोरी करत होता. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने बनावट चावीचा वापर करून एमजीएम रुग्णालय आणि मिनी घाटी रुग्णालयाच्या परिसरातून दुचाकी चोरी केल्या होत्या. चोरलेल्या सर्व गाड्या परभणी येथे असल्याचं त्याने सांगताच पोलिसांनी सर्व वाहने जप्त केली. त्याच्या ताब्यातील 26 मोटर सायकल सिडको पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.
सुटीच्या दिवशी चोरायचा दुचाकी - एकनाथ मुंडे हा परभणी जिल्ह्यातील एका कंपनीत कामाला आहे. त्याला प्रत्येक शनिवारी साप्ताहिक सुट्टी असायची. त्याच दिवशी तो रेल्वेने सकाळी छ. संभाजीनगरकडे निघायचा. शहरातील एमजीएम रुग्णालय, मिनी घाटी येथे जाऊन रुग्णालयात रुग्ण घेऊन आलेल्या नातेवाईकांची वाहने दुप्लिकेट चावी लाऊन चोरायचा आणि त्याच गाडीने तो गाव गाठायचा. ग्रामीण भागात चोरलेल्या गाड्या नाममात्र दरात विकून टाकायचा. कागदपत्राबाबत विचारणा झाल्यास बँकेकडून गाडी आणली आहे, नंतर मिळतील अशी काही कारणे सांगायचा. त्याच्याकडून 26 वाहनं जप्त केली असून आणखी वाहने आढळून येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.
हेही वाचा...