मुंबई : मुंबई हे विविधतेने नटलेलं एक ऐतिहासिक शहर आहे. हे ऐतिहासिक शहर पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक मुंबईत येत असतात. यात गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग, कमला नेहरू पार्क, म्हातारीचा बूट ही पर्यटकांची आकर्षणाची ठिकाणं आहेत. अशातच आता मुंबईतील पर्यटनाच्या ठिकाणांमध्ये आणखी एका ठिकाणाची भर पडली असून या ठिकाणाला दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. हे ठिकाण म्हणजे मलबार हिल येथे पालिकेनं बनवलेला निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच फॉरेस्ट वॉकवे.
सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरतोय : ट्री टॉप वॉक पाहण्यासाठी तुम्हाला आता लाखो रुपये खर्च करून सिंगापूरला जाण्याची गरज नाही. आता ट्री टॉप वॉकचा अनुभव तुम्हाला आपल्या देशात तेही मुंबईत घेता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं सर्वात श्रीमंतांची वस्ती असलेला परिसर अशी ओळख असलेल्या मुंबईतील मलबार हिल येथे हा निसर्ग उन्नत मार्ग म्हणजेच फॉरेस्ट वॉकवे तयार केला असून, हा निसर्ग उन्नत मार्ग सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरतोय. मुंबईत सर्वत्र सिमेंटचे जंगल झाल्याचं नेहमीच म्हटलं जातं. मात्र हा निसर्ग उन्नत मार्ग कमला नेहरू पार्क येथील जंगल भागात असल्यानं मुंबईच्या गजबजाटात तुम्हाला शांतता आणि निसर्ग या दोन्हीचा आनंद घेता येतो.
पुलाची एकूण लांबी ४७० मीटर : मुंबईतील वृक्षसंपदा झपाट्यानं कमी होतेय. सर्वत्र विविध विकास कामं, नव्या इमारतींची बांधकामं सुरू आहेत. मात्र, हा निसर्ग उन्नत मार्ग उभारताना पालिकेनं मलबार हिल येथील कोणत्याही झाडाची हानी होणार नाही, याची विशेष काळजी घेतल्याचं दिसून येतं. पालिकेच्या माहितीनुसार, हा फॉरेस्ट वॉक वे पूर्णपणे लाकडी असून, हा पूल उभारताना कमीत कमी यंत्राचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे बहुतेक काम हातानं केलंय. यात हायड्रोलिकचा देखील वापर करण्यात आलाय. या पुलाची एकूण लांबी ४७० मीटर असून, त्याची रुंदी २.४ मीटर इतकी आहे. या प्रकल्पासाठी एकूण २६ कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती पालिकेनं दिलीय.
पर्यटकांसाठी टाइम स्लॉट बनवले आहेत : सध्या हा निसर्ग उन्नत मार्ग पर्यटकांचं आकर्षण ठरत असून दररोज हजारो पर्यटक येथे भेट देत आहेत. संपूर्ण लाकडी पूल असल्यानं गर्दीचे नियंत्रण करता यावं आणि पर्यटकांना देखील या पुलाचा व्यवस्थित अनुभव घेता यावा, यासाठी पालिकेनं इथं टाइम स्लॉट बनवले आहेत. पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत हा पूल पर्यटकांसाठी खुला राहणार आहे. या संपूर्ण वेळेतील सर्व टाइम स्लॉट फुल्ल झाले आहेत. याची प्रवेश फी भारतीयांसाठी २५ रुपये असून, परदेशी नागरिकांसाठी १०० रुपये आहे. विशेष म्हणजे केवळ मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील अनेक पर्यटक किंवा हा निसर्ग उन्नत मार्ग पाहण्यासाठी मलबार हिल येथे येतायेत.
उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे : या पुलाची बांधणी करताना पालिका प्रशासनानं मुंबईकरांच्या सुरक्षेच्या आणि इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा देखील पूर्ण विचार केला असून, येथे अग्निशमन यंत्रणा तसंच उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सोबतच जंगलात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि पर्यटकांकडून देखील जंगलाची कोणतीही हानी होऊ नये, यासाठी पर्यटकांना वारंवार सूचना दिल्या जातायेत. त्यासाठी या पुलावर छोटे छोटे स्पीकर देखील बसवण्यात आले आहेत.
हा निसर्ग अनुभव छान वाटला... : फॉरेस्ट वॉकवे संदर्भात काही पर्यटकांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या. यावेळी, पुण्यातून आलेल्या एका पर्यटक महिलेनं सांगितलं की, "मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये हा पूल पाहिला. तेंव्हापासून या पुलाला भेट देण्याची इच्छा होती. सकाळचे आणि संध्याकाळचे सर्व टाईम स्लॉट फुल झाले आहेत. तसंच, मला दुपारच्या वेळेतील टाईम स्लॉट मिळाला. त्यामुळं मी आता दुपारी हा पूल पाहायला आले. येथे आल्यावर मला हा निसर्ग अनुभव छान वाटला, मनशांती मिळाली", असंही त्या महिलेनं सांगितलं.
सिंगापुरातच असल्याचा अनुभव : अनेक ज्येष्ठ नागरिक देखील या पुलाला भेट देत असून, योगासनांच्या ग्रुपमधील काही ज्येष्ठ नागरिकांशी आम्ही संवाद साधला. यावेळी, "हा पूल पाहण्याची आमची इच्छा होती. आम्हाला सर्वांना आज वेळ मिळाला, त्यामुळं आम्ही हा पूल पाहण्यासाठी आज आलो आहोत. इथंली झाडं, जैवविविधता, निसर्ग संपत्ती पाहून फार छान वाटलं. मुंबईच्या गजबजाटात देखील या शांत ठिकाणाचा अनुभव घेता आला. येथे आल्यावर आम्ही सिंगापुरातच आहोत, असा अनुभव आला", अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिलीय.
ऑनलाइन तिकीट स्कॅन करताना येतायेत तांत्रिक अडचणी : इथं येणाऱ्या पर्यटकांना शंभरहून अधिक विविध प्रकारची झाडं पाहायला मिळतात. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी पाहायला मिळतात. पक्षांचा गजबजाट अनुभवता येतो. अशा वातावरणात डोंगरावरून तुम्हाला समोर अरबी समुद्र दिसतो. त्यामुळं हा ब्लॉगर व तरुण तरुणींसाठी सेल्फी पॉईंट देखील बनत आहे. मात्र, इथं आल्यावर तिकीट खिडकी बंद असल्यानं, ऑनलाइन पद्धतीनं काढलेले तिकीट आणि त्याचा क्यूआर कोड स्कॅन होण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यानं गैरसोय होत असल्याचीही प्रतिक्रिया येथे येणाऱ्या काही पर्यटकांनी दिलीय. दरम्यान, मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार असल्याचं आयुक्तांनी म्हटलंय. त्यामुळं याठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगानं विशेष काळजी घेण्याचंही निर्देश आयुक्तांनी दिलेत.
हेही वाचा :