मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कथितपणे अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला नोटीस बजावलीय, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलंय. कामराला दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात खार पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलंय, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
चौकशी सुरू केल्यामुळे त्यांना प्राथमिक नोटीस : "आम्ही कामराच्याविरुद्धच्या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यामुळे त्यांना प्राथमिक नोटीस बजावलीय." 36 वर्षीय स्टँड अप कॉमेडियन असलेल्या कामरानं त्याच्या शोमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर वादग्रस्त टीका केल्यामुळे महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ निर्माण झालंय. खरं तर कामरानं "दिल तो पागल है" चित्रपटातील एका लोकप्रिय हिंदी गाण्याचे विडंबन केलं होतं, ज्यामध्ये शिंदे यांचा उल्लेख "गद्दार" (देशद्रोही) असा केला होता. कॉमेडिअन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'गद्दार' या आशयाचं गाणंच तयार केलंय. त्यांनी महाराष्ट्रातील अलिकडच्या राजकीय घडामोडींवर विनोदात्मक पद्धतीनं बोट ठेवलंय, ज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचाही उल्लेख आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेलांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी शिंदे यांच्याविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल कामराविरुद्ध एफआयआर दाखल केलाय.
शिवसेनेच्या समर्थकांची कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड : दुसरीकडे कुणाल कामरानं शिंदेंवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातलाय. या प्रकरणी शिवसेनेच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि इतर 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुणाल कामराविरोधात शिवसेना आणि भाजपा दोघांनीही आघाडी उघडलीय, तर विरोधी पक्ष याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं सांगत आहे. "कुणाल कामराचं लोकेशन आम्ही ट्रेस करतोय. जो कोणी कायदा हातात घेईल त्यावर कारवाई करणार आहोत. संविधानानं जरी बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. ठाकरेंनी कायदा व सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये," असं म्हणत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी कुणाल कामराचा शोध सुरू असल्याचं सांगितलंय.
हेही वाचा -