मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेन प्रवाशांना रविवार, 16 मार्च रोजी गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेनं उपनगरीय वाहतुकीच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला असून, आवश्यक अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलंय.
मेगा ब्लॉक जलद मार्गावर घेण्यात येणार : मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, हा मेगा ब्लॉक जलद मार्गावर घेण्यात येणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09:34 ते दुपारी 03:03 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन फास्ट/सेमी फास्ट लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्यांना कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात आले असून, गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी वेळेच्या 10 मिनिटे उशिरा पोहोचतील. तर दुसरीकडं सकाळी 10:28 ते दुपारी 3:40 दरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावरही थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास 10 मिनिटं उशिरानं पोहोचतील.
ट्रान्स हार्बर आणि पोर्ट लाईन सेवा सुरू राहणार : याचबरोबर, पनवेल/बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर सकाळी 9:45 ते दुपारी 3:49 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला असून, ट्रान्स हार्बर आणि पोर्ट लाईन सेवा सुरू राहणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा सुरू राहणार आहे. तर, बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असणार आहे. तसंच, या रविवारचा मेगा ब्लॉकचा मेल एक्सप्रेस गाड्यांवर देखील परिणाम होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथून निघणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरला येणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी दरम्यान लाईन 6 वर वळवण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचा -