बारामती (पुणे) : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिराला जाणाऱ्या रस्त्याचं काम करा. या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आणि चर्चेत आलं नसरापूर जवळ असलेलं हे 'बनेश्वर मंदिर'. भोर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गात लगत आणि नसरापूरपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर हो मंदिर आहे. तर या मंदिराच्या रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावं लागलं. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर आहे. वर्षभरात लाखो भाविक आणि पर्यटक मंदिराला भेट देतात.
शिवगंगा नदीच्या तीरावर आहे बनेश्वर मंदिर : बनेश्वर हे नावच या मंदिराचं वैशिष्ट्य दाखवतं. बन याचा अर्थ 'वन' किंवा जंगल , जंगलामध्ये असलेलं हे मंदिर म्हणून या मंदिराला आणि देवाला बनेश्वर असं नाव पडलं. प्रत्यक्षात हे महादेवाचं मंदिर आहे. बनेश्वराचं हे मंदिर 1749 साली पेशव्यांनी बांधलं. पेशवेकालीन मंदिर म्हणून देखील याला प्रसिद्धी आहे. हे मंदिर पाणथळ जागेत बांधलेलं आहे. शिवगंगा नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर बांधण्यात आलं आहे. मंदिराच्यासमोर आणि आजुबाजूला चार पाण्याचे कुंड आहेत. या कुंडामध्ये बारा महिने 18 काळ पाणी असतं. त्यामुळं हे मंदिर पाण्यावर बांधण्यात आल्याची मान्यता आहे. मंदिरामध्ये महादेवाची पिंड (लिंग) आहे. या महादेवाच्या पिंडीवरील साळुंखा उचलल्यानंतर त्याखाली आणखी एक लिंग अस्तित्वात आहे. त्याला पंचलिंग म्हटलं जातं. हे पंचलिंग पूर्णतः पाण्यात आहे. मंदिराच्या सभोवताली असलेल्या कुंड्यांमधून हे पाणी या पंचलिंगामध्ये सतत येत असत आणि तिथून बाहेर जात असतं. म्हणजेच या लिंगाभोवती सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो. अशाप्रकारे त्याची बांधणी करण्यात आली आहे. सकाळी 7 ते 10 या वेळेत या पंचलिंगाच दर्शन भाविकांना घेता येतं. असं ग्रामस्थ सांगतात.
मंदिरात आहे वसईच्या विजयाचे प्रतीक : पेशव्यांच्या काळामध्ये पेशवे चिमाजी आप्पा यांनी वसईमध्ये इंग्रजांबरोबर लढाई केली होती. चिमाजी आप्पांनी ही लढाई जिंकली होती. तेव्हा त्यावेळी तेथून इंग्रजांच्या चर्च मधून एक घंटा चिमाजी आप्पा यांना देण्यात आली होती. वसईच्या स्वारी वरून पुन्हा माघारी आल्यावर ही घंटा विजयाचे प्रतीक म्हणून या मंदिरातील प्रवेशद्वारावर बांधण्यात आली आहे. मराठ्यांनी इंग्रजांवर मिळवलेल्या विजयाची आठवण ही घंटा नेहमीच देत राहते. त्यामुळं या मंदिराला ऐतिहासिक देखील महत्त्व आहे. मराठ्यांच्या विजयाची साक्ष या मंदिरातील घंटा भाविकांना आणि पर्यटकांना देत असते. असं गावकरी सांगतात.
वर्षभरात लाखो भाविक घेतात महादेवाचं दर्शन : बनेश्वर मंदिरामध्ये वर्षभरामध्ये लाखो भाविक येत असतात. मंदिरामध्ये श्रावण महिन्यात मोठी जत्रा भरते. श्रावण महिन्यामध्ये दररोज या मंदिरामध्ये गर्दी असते तर दर सोमवारी 50 ते 60 हजार भाविक महादेवाच्या बनेश्वराच्या) दर्शनाला येत असतात. महाशिवरात्रीच्या वेळेला या मंदिरामध्ये कमीत कमी तीन लाख भाविक दर्शनासाठी येतात. वर्षभरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक सणांना लोक या मंदिरामध्ये दर्शनासाठी घेत असतात. त्यामुळं या मंदिराला धार्मिक स्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी बनेश्वर मंदिर देव संस्थांचे ट्रस्टी करत आहेत.
वनविभागात वसले आहे हे मंदिर : या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर वन विभागात आहे. या मंदिराच्या आसपास प्रचंड झाडे आहेत. त्याचबरोबर वन विभागाचं वन उद्यान आहे. लाखोच्या संख्येने या ठिकाणी झाडे आहेत. त्यामुळं या मंदिराचा परिसर हा नेहमीच थंड असतो. या मंदिर परिसराला प्रति महाबळेश्वर देखील म्हटलं जातं. उन्हाळ्यामध्ये जर महाबळेश्वरला जाणं शक्य नसेल तर अनेक जण या मंदिर परिसरात असलेल्या वन उद्यानाला भेट देतात. वनविभागाच्या वतीनं देखील या झाडांची येथील वनाची चांगली काळजी घेतली जाते. त्यामुळं धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं.
हेही वाचा -
- Trimbakeswar Shiva Temple Case : त्र्यंबकेश्र्वर शिव मंदिर प्रकरणाचा एसआयटी चौकशी अहवाल एक महिन्यात देणार - फडणवीस
- Maheshwari Shiva Temple : यजुर्वेदी ब्राह्मणांनी बांधलेले माहीमचे प्राचीन महेश्वरी शिव मंदिर; वाचा इतिहास
- हिंदू, मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं पोद्दारेश्वर राम मंदिर; जाणून घ्या १०३ वर्षांचा इतिहास