पालघर- पालघर लोकसभा मतदारसंघातून गेल्या दहा महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संसदेची तीन अधिवेशने तसेच या काळात मंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीगाठीतून ते पालघर जिल्ह्यातील प्रश्न कसे मार्गी लावता येतील, यासाठी प्रयत्न करत आहेत.
खासदार हेमंत सवरा यांनी निवडून आल्यापासून सातत्यानं पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. केवळ प्रश्न मांडून ते थांबले नाहीत, तर हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, याच्या उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या आहेत. संसदेच्या अधिवेशनात धोरणात्मक चर्चा तसेच अन्य बाबतीत त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दिल्लीत राहत असताना आपल्या वेळेचा उपयोग मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडण्यासाठी त्यांनी केला. रेल्वेमंत्री, आरोग्य मंत्री, रस्ते व बांधणीमंत्री, क्रीडामंत्री, कृषिमंत्री, ग्रामविकास मंत्री अशा बहुतांश संबंधित खात्याशी मंत्र्यांसोबत चर्चा करून त्यांनी अनेक प्रश्न मांडले. त्याचबरोबर काही प्रश्न सोडवून घेतले.
मंत्र्यांना सुधारणाही सुचवल्या- रेल्वे उड्डाणपुलाचे प्रश्न, पालघर रेल्वे स्थानकाचे प्रश्न तसेच उपनगरीय रेल्वे प्रश्न मांडताना त्यांनी काय सुधारणा करता येतील, हेही सांगितलं आहे. त्यांची प्रश्न मांडण्याची आणि प्रश्न सोडवून घेण्याची शैली जनतेला चांगलीच आवडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार सवरा यांच्याविषयी जनमत चांगले होत आहे. ते प्रश्न मांडत असलेली पद्धत लोकप्रतिनिधी अनुसरावी, अशी आहे. आता दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू असून या अधिवेशनानिमित्त दिल्लीत असताना खासदार सवरा यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
‘संसदेच्या अधिवेशनानिमित्त मी दिल्लीत असताना वेगवेगळ्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे, रस्ते तसेच दळणवळणाशी संबंधित अनेक प्रश्न वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून मांडत असतो. केंद्रीय मंत्र्यांचा वेगवेगळ्या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ते सोडवणुकीच्या दृष्टीने माझा पाठपुरावा सुरू राहील- डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर
पर्यटनाला वाव- नाशिकच्या कुंभमेळ्याला देश-विदेशातून लोक येणार आहेत. अनेकांना नाशिकला येण्याचा जवळचा मार्ग म्हणजे डहाणू ते त्र्यंबकेश्वर आहे. या रस्त्यावरून या काळात हजारो भाविक येणार आहेत. त्याचबरोबर मनोर-पालघर आणि मनोर-जव्हार म्हणून या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० ए या मार्गाची सध्याची अवस्था खराब आहे. या रस्त्याचे रुंदीकरण तसेच नुतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. नाशिक येथील होणारा हा कुंभमेळावा लाखो भक्त पर्यटक आणि साधुसंतांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या महामार्गावरून या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिकला जाताना पालघर जिल्ह्यातील अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे या महामार्गाच्या नजीक आहेत. त्यामुळे हा रस्ता खराब असेल, तर भाविकांच्या अडचणीत वाढ होईल. वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागेल, याबाबतही सवरा यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली.
नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाची मागणी- सध्या नाशिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुरुस्तीच्या आणि विस्तारीकरणासाठी निधी मंजूर करण्याची मागणी खासदार सवरा यांनी गडकरी यांच्याकडे केली. मनोर-पालघर आणि मनोर-जव्हार म्हणून या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची विनंती खासदार सावरा यांनी मंत्री गडकरी यांच्याकडं केली. या विनंतीला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात लवकर याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिलं आहे.
हेही वाचा-