बारामती (पुणे) : "एक चांगली पिढी घडवायची असेल तर त्यांच्यापुढं एक आदर्श असायला पाहिजे. राज्यातील महापुरुषांची स्मारके बांधली गेली तर तरुणांपुढं चांगला आदर्श राहील. त्यांचे विचार तरुणांपुढं पोहोचतील," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. "महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 200 कोटी रुपये निधी महानगरपालिकेला दिलाय. महापुरुषांचा-साधूसंतांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी निर्व्यसनी जीवन जगावं," असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या गावात त्यांनी विकासकामांचा शुभारंभ केला तर काही ठिकाणी विकासकामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय.
विरोधकांची लाडकी बहीण योजनेवर टीका : "लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली. पण आम्ही ती योजना सुरू ठेवली. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत आमच्यावर टीका झाली. निवडून आल्यावर आम्ही ही योजना बंद करू, असं म्हटलं गेलं. मात्र, आम्ही ती बंद केली नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी तीन हॉर्स पॉवर, पाच हॉर्स पॉवर आणि साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत वीजबिल माफ केलंय. त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजदराचा फायदा घ्यावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी घरे बांधून देण्याचा सरकारचा कार्यक्रम : "गरिबांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे विभागात 30 हजार घरे बांधण्याचा संकल्प केलाय. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत मोठा कार्यक्रम हाती घेतलाय. दोन-तीन कोटी घर बांधण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. यामध्ये महाराष्ट्राला 20 लाख घरे मिळाली आहेत. त्यामध्ये पुणे विभागात 30 हजार घरे आपण मंजूर करून आणली आहेत. तर बारामतीमध्ये 5000 घरे बांधण्यात येणार आहेत. याच्यामध्ये खूप चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना ही घरे देणार आहोत," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावंच लागणार : पुरंदरचे लोक विमानतळाला विरोध करीत आहेत. ज्यांच्या जमिनी जात आहेत, घरं आहेत ते लोक नाराज होत आहेत. मात्र, पुण्याच्या आणि या भागाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ आवश्यक आहे. तिथंही विमानतळाचं काम आता आपण हातात घेतलंय. त्याच्या नोटीस आपण काढलेल्या आहेत. त्या तुम्हाला पेपरला वाचायला मिळाल्या असतीलच. त्या भागातील लोक विरोध करीत आहेत. परंतु विमानतळ केल्याशिवाय आपल्या पुणे शहराचे, जिल्ह्याचे या सगळ्या भागाचे भलं होणार नाही. त्याच्यामुळं ते करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विकासकामांना विरोध करू नका," असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
हेही वाचा :