मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्रशासन लागले असून दुसरीकडं राजकीय पक्षांनी देखील आता रस्त्यावर उतरून तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आता शाखा भेटी घेण्यास सुरुवात केली. तर, दुसरीकडं युती आणि आघाडीच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. एका बाजूला पवार काका पुतणे एकत्र येणार अशा चर्चा असतानाच दुसरीकडं, मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चा देखील शिगेला पोहोचल्या आहेत. अशातच आता ठाकरे काका पुतण्यांचे बॅनर सेना भवन परिसरात लागण्यास सुरुवात झाली आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं सेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

काका पुतण्याचा वाढदिवस : उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. तर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं या काका पुतण्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शिवसेना भवनाबाहेर लागले असून, इतिहासात पहिल्यांदाच सेनेच्या काका पुतण्यांचे फोटो एकाच बॅनरवर छापण्यात आले आहेत. शिवसेना मनसे युतीबाबत सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सूचक संकेत दिले जात आहेत. अशातच वाढदिवसाच्या निमित्तानं या काका पुतण्याचे सेना भावनाबाहेरील बॅनर याच युतीच्या संकेतांपैकी एक आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
अंबादास दानवे आणि प्रकाश महाजन भेट : छत्रपती संभाजीनगर इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांची भेट घेतली आहे. या भेटीची देखील सध्या चर्चा आहे. प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहोचला. प्रकाश महाजन यांनी दंड थोपटत थेट नारायण राणेंना आव्हान दिलं आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. हा वाद सध्या तापलेला असतानाच अंबादास दानवे यांनी मनसेच्या प्रकाश महाजन यांची भेट घेणं म्हणजे हा देखील एक युतीचाच संकेत असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. या भेटीनंतर "प्रकाश काका आणि आमचे जवळचे संबंध आहेत. राणेंशी लढायला ते एकटे समर्थ आहेत. आमचे जवळचे संबंध असल्यानं मी प्रकाश काकांना भेटायला आलो," अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांचं शिवसेना मनसे युतीबाबत वक्तव्य : ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीबाबत वक्तव्य केलं. राज ठाकरे यांचं वक्तव्य माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एका सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील "महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्यास आपण तयार आहे," असं सर्वांसमोर जाहीर केलं. त्यानंतर आता जवळपास एक महिन्यांहून अधिकचा कालावधी उलटून गेला, तरी, दोन्ही भाऊ एकत्र येण्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचे संकेत मात्र वेळोवेळी दिले जात आहेत.
हेही वाचा :