अमरावती : आयटी कंपन्या या मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबादसारख्या शहरातून लहान जिल्ह्यांमध्ये याव्यात, अशी मागणी अनेकदा होते. मात्र, विविध सोयी सुविधा पाहता कंपन्यांना हे परवडणारं नाही. अशा परिस्थितीत सुवर्णमध्य साधणारी 'वर्क फ्रॉम टाऊन' ही संकल्पना नुकतेच विधान परिषदेवर निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय खोडके यांनी मांडली. संकल्पनेवर सरकार सकारात्मक विचार देखील करत आहे. 'वर्क फ्रॉम टाऊन' ही संकल्पना नेमकी कशी आहे? महाराष्ट्राच्या विकासासाठी ही संकल्पना नेमकी कशी फायद्याची ठरेल? याबाबत आमदार संजय खोडके यांनी खास 'ईटीव्ही भारत' शी संवाद साधला. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शशांक लावरे यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला.
'अशी' आहे संकल्पना : कोरोना काळात 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना पहिल्यांदा समोर आली आणि आयटी क्षेत्रातील तरुण आपल्या घरून कंमनीचं काम करत होते. आयटी पार्क अमरावतीत आणण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. आयटी कंपन्यांना मुंबई, पुणे, बंगळुरू या मोठ्या शहरात हव्या त्या सुविधा मिळत असल्यानं, इतर भागात जाण्यास त्या उत्सुक नसतात. यावर पर्याय म्हणून 'वर्क फ्रॉम टाऊन' ही संकल्पना समोर आली. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडं शंभर एकर जागा आहे. शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाची 50 एकर जागा आहे. या जागेवर सरकारनं कंपन्यांना हवे तसे कॉम्प्लेक्स उभारून द्यावेत. या कंपन्या स्थानिक मनुष्यबळ आपल्या कामासाठी नेमेल. जागेचं भाडं अभियांत्रिकी महाविद्यालय तसंच तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मिळेल. विशेष म्हणजे, शहरातील मुलांना आपल्या शहरातच रोजगार उपलब्ध होईल, अशी संकल्पना आमदार संजय खोडके यांची आहे.
शहराला 'असा' होईल फायदा : "'वर्क फ्रॉम टाऊन' या संकल्पनेनुसार, आयटी कंपन्यातील मुलं आपल्या शहरात राहून काम करतील. त्यांना जो पगार मिळेल तो आपल्या शहरातच खर्च होईल. या कंपनीत काम करणारे युवक आपल्या शहरातच प्लॉट घेतील, किराणा घेतील, भाजी आणि इतर साहित्य घेतील. यामुळं शहराचा इन्कम वाढेल," असं आमदार संजय खोडके म्हणाले.
अमरावती जिल्ह्याला मिळेल बुस्टर : अमरावतीच्या उद्योगाचा, विकासाचा अनुशेष अद्याप अपूर्ण आहे. सर्वात जास्त आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. 'वर्क फ्रॉम टाऊन' या संकल्पनेमुळं अमरावती जिल्ह्याला नवं बुस्टर मिळेल," अशी अपेक्षा आमदार संजय खोडके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
सरकारकडून सकारात्मक पुढाकार : "या अर्थसंकल्पात 'वर्क फ्रॉम टाऊन' या संकल्पनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाष्य करणार होते. मात्र, भाषण लांबल्यामुळं हा विषय राहिला. आमदार म्हणून सुलभा खोडके यांनी दोन वर्षांपूर्वीच हा विषय सभागृहात मांडला होता. त्यावेळीच अजित पवार यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हटलं होतं. तुमच्या मतदार संघात तुम्हाला कोणते महत्त्वाचे प्रकल्प हवेत? असं आम्हाला विचारलं होतं. त्यावेळी 'वर्क फ्रॉम टाऊन' ही संकल्पना आम्हाला अमरावतीत राबवायची असं सांगितलं होतं. ही संकल्पना येत्या काळात निश्चित अमरावतीत यशस्वी होईल. पुढे प्रत्येक जिल्ह्यासाठी ही संकल्पना फायद्याची ठरेल. संपूर्ण महाराष्ट्रात या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल," असा विश्वास आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -