पुणे : कर्जत जामखेड येथील नगराध्यक्षपदाच्या प्रकरणावरुन आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. मला धक्का देण्यासाठी हे सगळं सुरू आहे. या प्रकरणी दबाव, भीती दाखवून हे सगळं केलं जात असल्याचा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला. पुण्यात आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न : "२०१९ साली माझ्या सारख्या एका कार्यकर्त्यांकडून राम शिंदे यांना विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला आणि परत २०२४ मध्ये सर्वकाही वापरून देखील माझा पराभव झाला नाही. राम शिंदे सर हे माझे विरोधक असल्याने त्यांना विधानपरिषद देण्यात आली आणि मग त्यांना सभापती देखील करण्यात आलं. माझा आवाज दाबण्यासाठी हे सगळं केलं गेलं," असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. "मी अजून अडचणीत यावं म्हणून नगरपंचायतमध्ये फक्त राम शिंदे यांनी लक्ष घातलं नाही तर मुख्यमंत्री यांनी लक्ष घातलं. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. थेट एका छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश बदलण्यात आला आहे," असं यावेळी रोहित पवार म्हणाले.
दादांनी प्रश्न सोडवावेत : उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कर्जत-जामखेड दौऱ्यावर असताना रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून दादांचं स्वागत करण्यात आलं. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "दादांच्या स्वागताला अनेक कार्यकर्ते पत्र घेऊन गेले. मतदारसंघातील अनेक कामं अपूर्ण आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीसाठी निधी हवा आहे. तसंच माझे लोक तहानलेले आहेत. उपमुख्यमंत्री यांनी प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे. मी कॉपी करणारा माणूस नाही."
भाजपावर हल्लाबोल : काँग्रेस नेते संग्राम थोपटे हे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. "जे करायचं आहे ते लवकर करा, ज्यांना घ्यायचं आहे त्यांना लवकर घ्या. बोट भरली की डुबून जाते. भाजपामधील लोकांना काय मंत्रिपदं मिळाली? आशिष शेलार, गिरीश महाजन यांना कशी पदं मिळाली आहेत? भाजपाला घ्यायचं असेल तर त्यांनी झाडून पुसून सगळं घेऊन जावं. त्यामुळं नवीन लोकांना संधी देता येईल," असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
हेही वाचा - मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार पदावर प्रवीण परदेशी यांच्या नियुक्तीवर रोहित पवार यांची टीका