पुणे : गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी शनिवारी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन येथे डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.या प्रकरणी भिसे कुटुंबीय तसंच आमदार अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया दिली. "ही लढाई एका मातेसाठी होती. या मातेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही लढत होतो. एका चुकीमुळे साडेपाच तास त्या महिलेला उपचार मिळाले नाहीत. या अहवालातही तसंच म्हटलं आहे. आमची लढाई ही न्यायासाठी होती. पहिल्यापासून आम्ही सांगत होतो की डॉ.घैसास यांच्या चुकीमुळं ही घटना घडली आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मी मुख्यमंत्री यांचे आभार मानतो की, त्यांनी या प्रकरणी समिती गठित करत आम्हाला न्याय दिला," असं यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले.
माझ्यावर कोणताही दबाव नाही - आमदार : रुग्णालयावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याबाबत आमदार अमित गोरखे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की आमचा रुग्ण हे डॉ.घैसास यांच्या संपर्कात होते आणि डॉ. घैसास यांनीच दहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळं तेच दोषी असल्याचं आम्ही सांगत होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं या दोन मुलींचे दायित्व घ्यावं, अशी माझी सुरुवातीपासून मागणी आहे. ते त्यांनी करावं. अहवालाबाबतची सर्व माहिती घेवून कायदेशीर कार्यवाही करणार आहोत." "माझ्या भूमिकेत बदल असता तर समोर आलो नसतो. तसेच माझ्यावर कोणाचे प्रेशर नाही. मुख्यमंत्री यांनी मला न्याय देऊ असं सागितलं होतं.आणि आत्ता जे कलम लावले आहे त्यावर अटक होण्याची मागणी आम्ही करू," असं आमदार गोरखे म्हणाले.
वृत्ती विरोधात आमची लढाई : "आम्ही मागणी केली होती की, डॉ. घैसास यांना दोषी ठरवा आणि तसं झालं आहे. कुटुंब म्हणून आम्ही समाधानी आहोत. मुख्यमंत्री, आमदार गोरखे सगळे लढले. आम्ही ठाम होतो की, आम्हाला न्याय मिळेल आणि तो आम्हाला मिळाला आहे. आमचा हा लढा सुरूच राहील. तसेच हा लढा व्यक्ती विरुद्ध नाही तर वृत्ती विरोधी आहे," असा निर्धार स्वप्नील नहार यांनी केलाय. नहार हे तनिषा भिसे यांच्या पतीचे मित्र आहेत. "आमच्या घरात जे झालं ते इतर कोणाच्याही घरात होऊ नये. ज्यांनी जे जे आरोप केले त्याचे सर्व पुरावे आहेत. जे आरोप आम्ही केले त्याविरोधात आमच्याकडं पुरावे आहेत," अशी प्रतिक्रिया तनिषा भिसे यांची बहीण प्रियांका पाटील यांनी दिली.
हेही वाचा - तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल