मुंबई : दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तसंच अन्न व औषध यामधील भेसळीमुळं आरोग्यास हानी होतं. त्यामुळं भेसळ करू नये. याबाबत जनजागृती आणि विविध उपक्रम करण्यात येतात. दरम्यान, उद्या शनिवारी (7 जून) रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन राज्य सरकारतर्फे साजरा करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलीय. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
१८९ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र : "उद्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या कार्यक्रमात नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. राज्याच्या अन्न प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून भेसळीबाबत विभागाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जे दोषी आढळलेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. तसंच आगामी काळात ज्या ठिकाणी तेल, दुध, दही, पनीर यामध्ये भेसळ करतात आणि यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल," असा इशारा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलाय.
आषाढी वारीत जनजागृती करणार : पुढं बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, "आषाढी वारीच्या मार्गावर अन्न व औषध प्रशासनाच्या मार्फत विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. वारी दरम्यान, औषधांचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, यासाठी आरोग्य विभाग व औषध पुरवठादार यांच्यात समन्वय ठेवणं, मार्गावर असणाऱ्या अन्न छत्रांमध्ये स्वच्छ आणि योग्य असं अन्न मिळेल, याची खबरदारी घेणं. वारीतील मानाच्या पालख्यांमध्ये सुरक्षिततेबाबत योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्यामार्फत कायदा आणि सुरक्षित मानकं, याबाबत जनजागृती करणं. विशेष म्हणजे वारीत जे किर्तनकार किर्तन सांगतात, त्यांनी अन्न व औषध किंवा भेसळ या विषयावर किर्तन सांगावं, असा आमचा प्रयत्न आहे. मी स्वत: वारीत सहभागी होऊन अन्न व औषध किंवा भेसळीबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणार आहे, " असंही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं.
हेही वाचा :