जळगाव - भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद काही थांबता थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वी पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आयएएस महिला अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे आरोप केले होते. यावर आता गिरीश महाजन यांनी कठोर पाऊल उचलत पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथराव खडसे यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.
गिरीश महाजन यांनी सांगितले की, खडसे आणि थत्ते यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता त्यांच्यावर खोटे आरोप केले. ज्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिमा डागाळली गेली आहे. “हे प्रकरण आता न्यायालयात लढवले जाईल,” असे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या वकिलांमार्फत ही नोटीस पाठवल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनी अशी कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरून गिरीश महाजन यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यावरूनच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी या आरोपाला पाठिंबा देत गिरीश महाजन यांच्यावर टीका देखील केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महाजन यांना यासंदर्भात विचारणा केली होती. एकनाथ खडसे यांनी असा दावा देखील केला की अमित शाह यांच्याकडे महाजन यांचे कॉल रेकॉर्ड्स असून, त्यात रात्री उशिरापर्यंत झालेल्या संभाषणांचा उल्लेख आहे.
यावर प्रतिक्रिया देत गिरीश महाजन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, खडसे आणि थत्ते यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. एकनाथ खडसे यांनी एक पुरावा दाखवावा. माझा आता त्यांनी अंत पाहू नये. मी एका गोष्टीचा खुलासा केला, तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे. पण मी ती बोलणार नाही, असा थेट इशाराही महाजन यांनी खडसे यांना दिला होता. आता मात्र गिरीश महाजन यांनी कायद्याने लढा देत एकनाथ खडसे आणि अनिल थत्ते यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमुळे आता हे प्रकरण कायदेशीर वळण घेण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, याचा परिणाम स्थानिक पातळीवरील राजकारणावर होऊ शकतो.
या प्रकरणाने जळगावसह राज्यभरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. खडसे आणि महाजन यांच्यातील वैर जुने असून, यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या आहेत.