सातारा : कोयनेच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा घटत चालल्यानं पर्यटकांची पसंती मिळणारा बोटिंग व्यवसाय सध्या अडचणीत आलाय. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. त्याचा महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यटनासह स्थानिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. बोट व्यावसायिक हवालदिल झाले असून अनेक बोटी जलाशयाच्या किनाऱ्यावर उभ्या आहेत. दुसरीकडं सीबीएससी पॅटर्न असणाऱ्या शाळा सुरू असल्यानंही पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे.

सलग सुट्ट्यांमुळं तीन दिवस गर्दी : सलग सुट्ट्यांमुळं मागील तीन दिवस महाबळेश्वर आणि पाचगणी ही गिरीस्थानं पर्यटकांच्या गर्दीनं गजबजली होती. तीन दिवसात स्थानिकांचा व्यवसाय चांगला झाला. मात्र, सुट्ट्या संपल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. महाबळेश्वर, पाचगणीच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसत आहे.
पर्यटनाचा बेत महिनाभर लांबणीवर : सीबीएससी पॅटर्न असणाऱ्या शाळा 1 एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. संपूर्ण महिनाभर शाळा सुरू राहणार आहेत. मुलांची शाळा सुरू असल्यानं पालकांना पर्यटनाचा बेत आखता येईना. संपूर्ण मे महिना शाळांना सुट्टी असणार आहे. मात्र आता पालकांना सुट्याचा आनंद घेता येईना झाला आहे. त्यामुळं पुढच्या महिन्यात पर्यटनस्थळं गर्दीनं फुलल्याचं चित्र पाहायला मिळेल.

बोटिंग व्यवसाय अर्थिक संकटात : कोयनेच्या शिवसागर जलाशयात पर्यटक बोटिंगचा मनमुराद आनंद लुटतात. गेल्या दीड महिन्यापासून कोयना धरणातून पुर्वेकडं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पाणीसाठा घटत चालला आहे. पाणी कमी झाल्यामुळं पर्यटकांनीही तापोळा, बामणोलीकडं पाठ फिरवली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या अर्थव्यवस्थेवर आणि बोटिंग व्यवसायावर परिणाम झाला आहे. आठवड्यातून एकदा एका बोटीवर नंबर येत असल्यानं उर्वरीत दिवस बसून राहावं लागत असल्याची माहिती बोट व्यावसायिकांनी दिली.

हेही वाचा :
- थाई सॅक ब्रूड व्हायरसमुळं मधमाशांचा नाश; महाबळेश्वर, वाई, जावली तालुक्यातील मधपालांना अर्थिक फटका
- वळीवानं दमदार हजेरी लावत कराडला गारांच्या पावसानं झोडपलं, बुधवारी संपूर्ण राज्यात यलोसह ऑरेंज अलर्ट
- बहरलेल्या कास पठारावर रानगव्यांचा कळप ; पर्यटकांना पळता भुई थोडी, जीव मुठीत घेऊन पळाले हादरलेले पर्यटक - Gaur On Kas Plateau