मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रेल्वेच्या ३,५०० लोकल फेऱ्या दररोज धावतात. त्यातून सुमारे ८० लाख प्रवासी रोज प्रवास करतात. किमान फेऱ्या कशा पद्धतीने वाढतील आणि प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येईल, याबाबत सखोल प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी रेल्वे मंत्र्यांनी एक त्रिसूत्री सांगितली. दरम्यान, पायाभूत सुविधा, नवे तंत्रज्ञान आणि चांगल्या रेल्वे ही त्रिसूत्री मुंबईकरांचा प्रवास येणाऱ्या काळात सुखकर करेल, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईकरांच्या आयुष्यात चांगला बदल घडून येईल : मुंबईत प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून पडून गेल्यावर्षी अडीच हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यावर काय उपाययोजना करणार, असा प्रश्न रेल्वेमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी त्रिसूत्री सांगितली. तसेच, या सर्व गोष्टी झाल्यानंतर सुमारे ५० टक्क्यांनी गाड्यांच्या फेऱ्या वाढू शकतात. आज जेवढ्या फेऱ्या सुरू आहेत, त्यापेक्षा किमान दीडपट जास्त फेऱ्या चालविणे शक्य होईल. याच्या जोडीला मेट्रो, कोस्टल रोड देखील असेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यामुळं मुंबईकरांच्या आयुष्यात चांगला बदल घडून येईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
आधी पायाभूत सुविधा वाढविणे : अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "पहिला भाग म्हणजे पायाभूत सुविधा वाढविणे. यासाठी सुमारे १७ हजार कोटी रुपये किमतीचे प्रकल्प मुंबईत हाती घेण्यात आले आहेत. सीएसएमी-कुर्ला, बोरीवली-विरार, पनवेल-कर्जत, एरोळी-कळवा, कल्याण-आसनगाव, कल्याण-बदलापूर, कल्याण-कसारा, निलजे-कोपर इत्यादी मार्गांवर दुहेरीकरण तसेच तिसऱ्या मार्गिकांची कामे सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढल्या तर जास्त लोकल चालविता येतील. आधी पायाभूत सुविधा वाढवले तर जास्त गाड्या चालविता येतील. ८५ लाख लोकांना प्रवासासाठी जास्त जागा पुरवावी लागेल."
मुंबईसाठी वेगळं 'कवच' : दुसरा मुद्दा म्हणजे, जास्त लोकल गाड्या उपलब्ध करुन देणे. यासाठी 'कवच'च्या पाचव्या टप्प्यावर काम सुरू आहे. हे विशेषत: मुंबईसाठी विकसित करण्यात येत आहे. यावर्षी डिसेंबरअखेरपर्यंत याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या तंत्रज्ञानामुळे आज दोन लोकल ट्रेन्समध्ये किमान १८० सेकंदांचे अंतर ठेवावे लागते, ते ३० टक्क्यांनी कमी केल्यास ३० टक्के जास्त गाड्या उपलब्ध होऊ शकतात. तसे झाल्यास साहजिकच लोकलमधील गर्दी कमी होईल, असे असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
मुंबईला हव्या वेगळ्या लोकल ट्रेन्स : तिसरे सुत्र म्हणजे, चांगल्या लोकल ट्रेन्स. चांगल्या गाड्या म्हणजे रेल्वे गाड्यांच्या तंत्रज्ञानात पूर्णपणे बदल करावा लागेल. मुंबईसाठी लोकल ट्रेन्सची विशिष्ट गरज आहे. प्रचंड गर्दी हताळता येईल, अशा गाड्या मुंबईला लागतात. एका चौरस मीटर जागेत किती जण मावतात, याची आकडेमोड करण्यात येते. मुंबईसाठी एकदम नव्या रचनेच्या गाड्यांची गरज आहे. त्यात खेळती हवा, प्राणवायूची उपलब्धता, दरवाजे बंद होण्यासाठी कमीत कमी वेळ लागणे इत्यादी. सेऊलमध्ये अक्षरश: लोकांना गाड्यांमध्ये बसविण्यासाठी रेल्वे स्थानकांवर मार्शल असतात. ते लोकांना ट्रेनमध्ये ढकलतात आणि त्यानंतरच दरवाजा बंद होतो. हा विचार करुनच मुंबईसाठी २३८ नव्या रचनेच्या लोकल गाड्यांवर काम करण्यात येणार आहे. त्याच्या रचनेला लवकरच अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिल्लीत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे इनपुट दिले होते, अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
ऑफिसच्या वेळा बदलण्याबाबत विचार सुरू - मुख्यमंत्री : स्टँडर्ड ऑफिसच्या वेळांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. यावेळी "आम्ही बदलण्याबाबत विचार केला आहे. आम्ही मंत्रालयात याबाबत काही करु शकतो का? याबद्दल विचार सुरू आहे", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा :