मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने जुन्याच आरक्षण पद्धतीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा नगर विकास विभागाने प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश जारी केलेत. नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, मुंबईत 227 प्रभाग रचना कायम राहणार असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसारच या निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत.
प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची : निवडणूक आयोगाने सदरच्या प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले असून, प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे देण्यात आलीय. त्यामुळे मुंबईतील 227 प्रभाग रचनांचा आराखडा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तयार करणार आहेत. मंगळवार रात्री जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, ही प्रभाग रचना लगतच्या जनगणनेवर अवलंबून असणार असून, 2011 च्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना केली जाणार आहे.
प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या जाणार : मुंबईतील 227 प्रभाग रचनांचे आराखडा प्रारूप तयार करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर असून, आयुक्त भूषण गगराणी हा आराखडा तयार करून निवडणूक आयोगाला सादर करतील. निवडणूक आयोगाने या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त ही प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर या प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या जाणार आहेत. या हरकती आल्यानंतर त्याचा एक सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि हा सुधारित प्रभाग रचनांचा आराखडा पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या अंतिम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर अंतिम आराखडा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रसिद्ध करतील, असे नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना तयार : प्रभाग रचना तयार करण्याचे देखील नियम असतात. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रभाग रचनेची सुरुवात उत्तरेकडून ईशान्य दिशेकडे केली जाते. त्यानंतर याचा शेवट पूर्व दिशेकडून दक्षिण दिशेकडे केला जातो. हे प्रभाग रचना करताना त्यांना याच दिशेने क्रमांकदेखील दिले जातात. यात एखादी इमारत अथवा चाळ दोन प्रभागांमध्ये येणार नाही याची काळजी देखील घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत.
10 महानगरपालिकांच्या प्रभाग रचना तयार : बृहन्मुंबई महानगरपालिकेसह एकूण 10 महानगरपालिकांच्या प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश जारी करण्यात आले असून, अ, ब आणि क या श्रेणीतील महानगरपालिकांची प्रभाग रचना चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. यात बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका या अ श्रेणीमध्ये येतात. तर पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक या महानगरपालिका ब श्रेणीमध्ये येतात. तर क श्रेणीमध्ये छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि वसई विरार महानगरपालिका यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रशासनाला त्याची माहिती गुगल अर्थवर द्यावी लागणार असून, यावर अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्या अधोरेखित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचाः