छत्रपती संभाजीनगर : शहरातील उद्योजकानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलय. 46 वर्षीय व्यक्ती रोज दोनशेहून अधिक दंड बैठका आणि जोर काढतोय. त्यांना शरीर सुदृढ करायचं असेल असं वाटत असलं तर ते बरोबर आहे. पण त्यांचा एक वेगळा उद्देश्य यात दडलाय. मराठा आरक्षासाठी समाजानं केलेल्या आंदोलनांची दखल अनेकांनी घेतली. सरकार दरबारी अनेक आश्वासनं मिळाल्यानंतर आंदोलन थांबलं, अशी धारणा सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली. मात्र आंदोलन थांबलेलं नाही असा संदेश देण्यासाठी शहरातील सुरेश फुलारे या व्यावसायिकानं एकट्यानं आंदोलन सुरू ठेवलय.
अनोख्या पद्धतीनं केली आंदोलनाला सुरूवात : सुरेश फुलारे यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात केली. ज्यामध्ये जोर बैठका आणि दंड बैठका मारत ते आंदोलन करत आहेत. रोज दंड बैठक आणि जोर बैठक वाढवण्यात येते. दहा बैठकांपासून सुरू झालेलं हे आंदोलन 212 बैठकांपर्यंत येऊन पोहचलं आहे. "या आंदोलनाबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र आणि व्हिडिओची सीडी देऊन स्मरण देण्यात येतं," अशी माहिती सुरेश फुलारे यांनी दिली.
आंदोलनाचा फरक पडेना : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांनी अनेक आंदोलनं केली. उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलनं केली. अनेकांनी बलिदान देऊन सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी लाखोंचे मोर्चे काढले. मात्र, हाती आश्वासनांशिवाय काही लागले नाही. त्यामुळं समाज खचून गेला आहे. आता आंदोलनं संपली अशी भावना काही लोकांची झाली आहे. पण आम्ही जिंकल्या शिवाय लढाई संपत नाही. खचलेल्या समाजाला मजबूत बनवण्यासाठी वाळूज इथले 46 वर्षीय व्यावसायिक सुरेश फुलारे यांनी अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली. आरक्षण समाजाला ताकद देऊ शकते, तसा व्यायाम शरीराला मजबूर ठेवतो हा संदेश देण्यासाठी दंड बैठक आणि जोर बैठक मारून अनोख्या पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात केली.
रोज वाढते एक दंड बैठक : 23 नोहेंबर 2024 पासून सुरेश फुलारे यांनी जोर बैठक आणि दंड बैठक आंदोलन चालू केलं आहे. पहिल्या दिवशी 10 जोर आणि दंड बैठक मारले. तर त्यात रोज एक-एक जोर आणि दंड बैठक वाढवली. मंगळवारी आंदोलनाला 202 दिवस झाले. दहापासून सुरू झालेल्या जोर आणि दंड बैठकीचा आकडा आता 212 दंड बैठक आणि तितकेच जोरपर्यंत जाऊन पोहचला आहे. घरी असो की फिरतीवर, रोज सकाळी उठल्यावर पहिले अनोखे आंदोलन आणि नंतर आपले काम असा दिनक्रम सुरू करण्यात आला. आंदोलन सुरू केल्यावर अद्याप सरकारनं दखल घेतलेली नाही. त्यामुळं अधून-मधून आंदोलनाचे पत्र, व्हिडिओ मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतं. "सरकारनं जरी या आंदोलनाची दखल घेतली नसली तरी शरीर मात्र मजबुत झालं आहे. असंच आंदोलन चालत राहिलं तर एक दिवस सरकार या आंदोलनाची दखल घेईल," असा विश्वास सुरेश फुलारे यांनी व्यक्त केला.
रोजचा व्हिडिओ करत आहे रेकॉर्ड : एकट्यानं सुरू केलेल्या आंदोलनाचा पुरावा असणं गरजेचं आहे. त्यामुळं सुरेश फुलारे रोज सकाळी जोर बैठक आणि दंड बैठक करत असताना त्याचा दाखला म्हणून व्हिडिओ तयार करून ठेवतात. त्यांच्या समाज माध्यमांवर ते व्हिडिओ टाकून आंदोलन सुरू असल्याचा पुरावा साठवून ठेवत आहेत. रोज एक तास हे आंदोलन करतात. "शरीर सुदृढ होत आहे. आरक्षण मिळाल्यास समाज देखील सुदृढ होईल असा विश्वास असल्यानं आरक्षण मिळेपर्यंत हे अनोखं आंदोलन सुरू ठेवणार आहे," असा निर्धार सुरेश फुलारे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :