मुंबई : व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मिळून सुमारे 85 जोडपी विवाहबध्द होणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात सुमारे 22 ते 25 आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सुमारे 50 ते 60 जोडपी विवाहबध्द होतील. मुंबई शहरात दर दिवशी सरासरी 8 ते 10 विवाह होतात. तर, मुंबई उपनगर जिल्ह्यात दर दिवशी सरासरी 25 ते 30 विवाह होतात. मात्र, व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून अनेकांना आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करावी, असं वाटतं. त्यामुळं 14 फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे दिवशी विवाह नोंदणी कार्यालयात नेहमीपेक्षा जास्त जणांचे विवाह आयोजित केले जातात.
अशी होती विवाह नोंदणी : विशेष विवाह कायदा 1954 अन्वये विवाह करु इच्छिणाऱ्यांना विवाह निबंधक कार्यालयात विवाह इच्छुक तरुण तरुणींना नोंदणी करावी लागते. त्यानंतर 30 दिवसांची नोटीस दिल्यानंतर त्यांना विवाह करता येतो. नोटीस दिल्यानंतर कोणतेही आक्षेप नोंदवले गेले तर त्याबाबत विवाह नोंदणी अधिकारी निर्णय घेतात. मात्र, जर कोणतेही आक्षेप नोंदवले गेले नसले तर संबंधितांना 30 दिवसांनंतर 90 दिवसांपर्यंत त्यांना विवाह करता येतो. आठवडाभरात त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं.
वर्षभरात 1430 विवाह झाले : मुंबई शहर जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात 2024 च्या जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत या कार्यालयाच्या माध्यमातून 1430 विवाह झाले. तर, 2025 च्या जानेवारी महिन्यात 100 विवाह पार पडले, 14 फेब्रुवारी रोजी सुमारे 22 ते 25 विवाह पार पडतील, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या विवाह अधिकारी व विवाह निबंधक गीता नागपुरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
राज्यात तीन जिल्ह्यात विवाह अधिकारी कार्यालय कार्यरत : राज्यातील मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा व पुणे जिल्हा या केवळ तीन जिल्ह्यांमध्ये विशेष विवाह अधिकारी आणि विवाह निबंधक कार्यालय कार्यरत आहे. अन्य ठिकाणी जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधकांना विवाह नोंदणीचे अधिकार देण्यात आले आहेत.
काय आहे कायदा? : विवाह करु इच्छिणाऱ्यांना वय, पत्ता यांचा पुरावा द्यावा लागतो. यामधील वधू आणि वर भिन्न धर्मिय असले तरी त्यांना धर्मांतर करण्याची गरज नाही. नोटीस व नोंदणी अशा प्रकारे अवघ्या 200 रुपयांत हा विवाह संपन्न होतो. विशेष म्हणजे विवाह नोंदवण्याचे अधिकार विवाह नोंदणी अधिकाऱ्यांना असले तरी रद्द करण्याचे अधिकार मात्र सक्षम न्यायालयाला आहेत.
हेही वाचा -