नांदेड : शेतकऱ्यांबद्दल बेजबाबदार विधान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्य मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे, असं विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलंय. तसंच, शक्तीपीठ महामार्गासाठी जो अवास्तव खर्च दाखवलेला आहे, म्हणजे यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्तीपीठ महामार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. आम्ही तो होऊ देणार नाही, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय.
कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अवमान केला, त्यांनी राजीनामा द्यावा : बुधवारी (दि.९) राजू शेट्टी हे नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी, "कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या हातात पडत नसतात, ते बँकेत जातात. तरीही माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. त्यामुळं त्यांनी राजीनामा घ्यावा", असं राजू शेट्टी म्हणाले. याशिवाय, "बेजबाबदार कृषीमंत्री मी बघितला नाही. भिकारी सुद्धा १ रुपया घेत नाही, १ रुपयाला पीकविमा ही सरकारची हूल होती. कर्जमाफीवर बोलताना सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांवर आरोप केले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडाली. त्यात कोकाटे देखील एक आहेत. हे बुडवे आहेत आणि अक्कल पाजळत आहेत", अशा शब्दांत राजू शेट्टी माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केलीय.
पाशवी बहुमत मिळवून सुद्धा प्रशासनावर पकड नाही : पुढं राजू शेट्टी म्हणाले की, "शक्तीपीठ महामार्गासाठी जो अवास्तव खर्च दाखवलेला आहे, म्हणजे यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शक्तीपीठ मार्ग म्हणजे अर्थकारण आहे. ५५ हजार कोटींचा जादा खर्च दाखवला आहे. असा हा महायुतीचा कारभार आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. पाशवी बहुमत मिळवून सुद्धा प्रशासनावर पकड ठेवता आली नाही", असं म्हणत राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसंच, शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- 'कंत्राटी महिला वैद्यकीय सहाय्यक प्राध्यापकांना प्रसूती रजा देण्याची कृपा करावी,' आदित्य ठाकरेंचे पालिका आयुक्तांना पत्र
- २ दिवसांत कर भरा अन्यथा...; अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे पालिकेची मिळकतकर वसुलीसाठी नोटीस
- 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हायड्रोपोनिक गांजा अन् 54 लाख रुपयांचे सोने जप्त; 3 विमान प्रवाशांना अटक