अमरावती : मेळघाटात चिखलदरासह 'आमझरी', 'माखला' या गावात मोठी आमराई आहे. या व्यतिरिक्त इतर भागात दोन-तीन झाडं दिसतात. धारणी तालुक्यात अगदी मध्य प्रदेशच्या सीमेवर काही गैर आदिवासी सदन शेतकऱ्यांनी एक दोन ठिकाणी आंब्याची शेती करण्याचा प्रयत्न केला. आता धारणी तालुक्यात घनदाट जंगल परिसरात वसलेल्या 'मांगीया' या अर्धवट उजाड झालेल्या गावालगत जंगल परिसरात एका आदिवासी कुटुंबानं पाच वर्षांपूर्वी आपल्या शेतात आंब्याची सहाशे झाडं लावली होती. त्या झाडांना यावर्षी बहर आलाय. मांगीया येथील आंबा हा केसर प्रजातीचा असून हा आंबा बहरल्यानं पाच वर्षांची प्रतिक्षेला आणि मेहनतीला यश आल्याचा आनंद या आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. घनदाट जंगलात बहरलेल्या या आंब्यांसंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट...
अर्ध्या गावाचं झालं पुनर्वसन : घनदाट जंगलांनी वेढलेल्या मेळघाटातील ३२ गावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या ३२ गावात चिखलदरा आणि धारणी तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या मांगीया या गावाचा देखील समावेश आहे. ७०० लोकसंख्या असणाऱ्या मांगीया गावातील एकूण ४९० जणांनी २०२० मध्ये गाव सोडलं. ज्याचं पुनर्वसन झालं. त्या कुटुंबाला प्रत्येकी १० लाख रुपये मिळाले. मात्र, अनेकांनी आपलं गाव सोडून जायचं नाही असा निर्णय घेतला. यामध्ये कमल दुर्वे यांच्या कुटुंबानं देखील गाव सोडायचं नाही, असं ठरवलं.

मजुरी कामावर पर्याय म्हणून लावला आंबा : संपूर्ण कुटुंब मजुरीसाठी सतत बाहेर गावी राहतं. जी काही मजुरी मिळते, त्यात देखील काही भागत नाही, म्हणून कुटुंबातील सदस्य हे मजुरी कामासाठी मेळघाटबाहेर जातात. एकानं मात्र गावात राहून शेतीच पाहायची असा निर्णय घेतला. "२०२० मध्ये गावातील लोकं गाव सोडून जाण्याच्या तयारीत असताना, कृषी विभागाच्या एका योजनेंतर्गत आम्ही शेतात आंबा लावण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात शेतात झाडांसाठी खड्डे काढण्यात आले. त्यानंतर त्यात शेण खत आणि इतर रासायनिक द्रव्य टाकून ते खड्डे बुजवले. यानंतर पावसाळ्यात कृषी विभागानं सूचवलेल्या बडनेरा येथील एका भागातून आंब्याची सहाशे रोपं आणली आणि बुजवलेले खड्डे पुन्हा उघडून त्यात आंब्याची रोपं लावली", असं कमल धुर्वे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

आंब्यासाठी शेतातच ठिय्या : सख्खे चुलत अशा चार भावांचं हे शेत असून शेतीची संपूर्ण जबाबदारी ही कमल धुर्वे यांच्याकडं आहे. गत पाच वर्षात लावलेले सहाशे आंब्यांच्या झाडाची देखभाल ते करतात. शेतात असणाऱ्या विहिरीतून पाणी काढून गहू, मका ही हंगामी पीकं देखील त्यांनी घेतली. आता काही दिवसापूर्वी शेतातून एक मशीन कोणी चोरून नेली आणि सौर ऊर्जा यंत्रणा ठप्प झाल्याची व्यथा कमल धुर्वे सांगतात. असं असलं तरी शेतातील सर्व झाडांना आंबे लागले आहेत, याचा आनंद त्यांना आहे.

शेतात पक्षांचा त्रास, वाघ आणि अस्वलही येतात : "आता शेतात पक्षांचा त्रास वाढलाय. पक्षी आंबे खायला येऊ नयेत, यासाठी दगड जमा करून ते पक्षांच्या दिशेनं आम्ही भिरकवतो", असं कमल धुर्वे म्हणाले. रात्रीचा मुक्काम शेतात मचाणावर असतो. शेतात वाघ, अस्वल नेहेमी येतात. त्यांना देखील शेतातून हुसकावून लावण्याचं धाडसी काम कमल धुर्वे करतात. त्यांच्यासोबतील आता लहान भाऊ रमेश धुर्वे हे देखील शेतात मदतीला आले आहेत.
आंबा विक्रीचं असं आहे नियोजन : पहिल्यांदाच कमल धुर्वे यांच्या शेतात आंबा बहरला. इस्रायल पद्धतीच्या झाडांप्रमाणे या आंब्याच्या झाडांना खालच्या बाजूनच आंबे लागले आहेत. ते सहज हातानं तोडता येतात. आता काही दिवसांनी यांची तोडणी केली जाईल. या आंब्याला चांगला बाजार कुठे आहे? याची फारशी माहिती कमल धुर्वे यांना नाही. "आम्ही धारणीत हा आंबा विकू", असं ते म्हणाले. तसंच, "पुढच्या वर्षीपासून आंब्याला चांगला भाव कुठे मिळेल? ही माहिती घेऊन नियोजन करू", अशीही माहिती कमल धुर्वे यांनी दिली.
हेही वाचा -