अहिल्यानगर : राज्यामध्ये दहावीचा निकाल मंगळवारी लागला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदा देखील मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. दरम्यान, रात्रशाळेच्या माध्यमातून अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याच्या ध्येयानं दहावीची परीक्षा दिली आणि जिद्द, मेहनतीसोबत वडापावचा गाडा हाकत दहावीचा शिखर यशस्वीरित्या पार केलाय, तो म्हणजे शहरातील 47 वर्षांच्या वडापाव विक्रेत्या मंगल रंगनाथ रांधवन-बोरुडे यांनी. मंगल यांनी तब्बल 32 वर्षांनी आपलं राहिलेलं अपूर्ण शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना दहावीत 57.20 टक्के गुण मिळाले आहेत.
32 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर दिली परीक्षा : 1993 साली मंगल यांचं राजेंद्र बोरुडे यांच्याशी लग्न झालं. लग्नानंतर संसाराचा गाडा हाकत मुलाचा सांभाळ करताना सतत पुढील शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत त्यांच्या मनात राहिली. त्यावेळी 47 वर्षीय मंगल रांधवन-बोरुडे यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. वर्षभर शाळेला नियमित हजेरी लावू दहावीची परीक्षा दिली. 32 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर त्यांनी यावर्षी दहावी उत्तीर्ण केली आहे. आता पुढील शिक्षण घेण्याची तयारी असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. त्याला पती राजेंद्र बोरुडे यांनीही पाठिंबा दिला आहे. तसंच शिक्षण महत्त्वाचं असून प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे, असा संदेश देखील मंगल बोरुडे यांनी यावेळी दिला आहे.
वडापावचा व्यवसाय: बोरुडे यांचा दिनक्रम पहाटेच सुरू होतो. पहाटे वडापावच्या दुकानावर लागलणारे साहित्य तयार करणं. त्यानंतर घरातील स्वयंपाक आणि इतर गोष्टीची आवराआवर केल्यानंतर, सकाळी 7 ते 8 च्या सुमारास पतीसह वडापावच्या गाडीवर येतात. मग दिवसभर पती राजेंद्र बोरुडे आणि मंगल बोरुडे या वडापावच्या गाडीवर थांबून व्यवसाय करतात. तर मंगल बोरुडे यांना मिळालेल्या यशाचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याचबरोबर दहावीच्या यशानंतर मंगल बोरुडे यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली हे मात्र नक्की!
हेही वाचा -