
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल आक्षेपार्ह 'एआय'-जनरेटेड व्हिडिओ; नवी मुंबईत गुन्हा दाखल
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल आक्षेपार्ह संदर्भ असलेले एआय-जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल नवी मुंबईतील एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

By PTI
Published : October 9, 2025 at 4:44 PM IST
ठाणे : भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) भूषण गवई यांच्याबद्दल आक्षेपार्ह संदर्भ असलेले एआय-जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल नवी मुंबईतील एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. सध्या आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल : नवी मुंबईतील पनवेल येथील रहिवासी आरोपीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर करून सरन्यायाधीश गवई यांच्याबद्दल अपमानास्पद संदर्भ असलेला व्हिडिओ तयार केला होता.
आरोपीचा शोध सुरू : पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, "मंगळवारी पनवेलमधील एका व्यक्तीने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला व्हिडिओ पाहिला. त्यानंतर तक्रार दाखल केली." तक्रारीच्या आधारे, बुधवारी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा) च्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सायबर तज्ञांचीही मदत घेण्यात आली : व्हिडिओचा मूळ स्रोत आणि निर्मिती प्रक्रिया शोधण्यासाठी सायबर तज्ञांचीही मदत घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. "आम्ही व्हिडिओच्या प्रसारणामध्ये सहभागी असलेले आयपी अॅड्रेस आणि डिजिटल फूटप्रिंट्स पडताळत आहोत," असे पोलीस अधिकाऱ्याने 'पीटीआय'ला सांगितले.
आक्षेपार्ह मजकूर त्वरित काढून टाकण्याचे निर्देश : पोलिसांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आक्षेपार्ह मजकूर त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सोमवारी नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकिलाचा परवाना तत्काळ निलंबित केलाय.
हेही वाचा -

