मुंबई - अंगणवाडी सेविकांनी मुंबईतील उपनगरात बालकांच्या केलेल्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ बालके कुपोषित असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मुंबई उपनगरसारख्या प्रगत जिल्ह्यात कुपोषित बालकं तपासात आढळणं, ही बाब चिंताजनक आहे. यावर प्रशासनानं पुढील १० दिवसात लेखी अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ कुपोषित बालके असल्याचं निदर्शनाला आल्यानं उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महिला आणि बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री आशिष शेलार यांनी कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याकरिता प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
असे आहे मुंबई उपनगरामध्ये कुपोषणाचं प्रमाण- मुंबई उपनगरातील एकात्मिक बाल विकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅकर अॅपवर फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण २ लाख ३८ हजार ९४ बालकांची नोंद घेतली गेली. यातील २ लाख ३४ हजार ८९६ बालकांची वजन आणि उंची मोजण्यात आली. यानुसार अंगणवाडी सेविकांच्या पोषण ट्रॅकर अॅपवरील नोंदीनुसार अतितीव्र कुपोषण म्हणून २ हजार ८८७ बालकांची नोंद आहे. तर मध्यम तीव्र कुपोषण म्हणून १३ हजार ४५७ बालकांची नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू- मिळालेल्या माहितीनुसार, या नोंद झालेल्या अति तीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामधून १,१५९ बालके तीव्र तर ३,०९६ मध्यम तीव्र कुपोषित असल्याचं निष्पन्न झालं. तर फेब्रुवारी २०२५ मध्ये अतितीव्र कुपोषित ४५० आणि मध्यम कुपोषित ४०७ बालके आढळली आहेत. मात्र, या संख्येचे अधिकृत प्रमाणिकरण करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.
बाल विकास केंद्रे सुरू करण्याचं नियोजन- कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, तपासणीअंती आढळणाऱ्या सर्व तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच अधिक शहरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
हेही वाचा-