बारामती- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील माळेगाव येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सभासद शेतकऱ्याच्या मेळाव्यामध्ये बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ द्या. भावनिक होऊ नका, असं आवाहन त्यांनी सभासदांना केलंय. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये नूतनीकरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरणदेखील करण्यात आलं.
माळेगावच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यावेळी अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, साखर कारखाना हा तुमच्या प्रपंचाशी जोडलेला आहे. त्या ठिकाणी कोणतं नेतृत्व आहे, हे महत्वाचं आहे. माळेगावच्या सभासदाना उसाच्या भावांमध्ये काही कमी पडू देणार नाही. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगली ओळख आहे.
कऱ्हा नीरा जोड प्रकल्प ड्रीम प्रोजेक्ट- आपल्याला आणखी काही गोष्टी करायच्या आहेत. कऱ्हा नीरा जोड प्रकल्प हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यानंतर या भागातील साखर कारखान्यांना ऊस कमी पडणार नाही. मी कारखाना चांगला चालवून भावही चांगला देईल. कारखान्याच्या कामगारांचे प्रश्नही सोडवील, असे म्हणत अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचा आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकमध्ये आपल्या विचाराच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन केलं. सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. काही परवानगी असतील अडचणी असतील, त्या जेवढे झटपट मी सोडवू शकतो. तेवढे दुसरा कोणी सोडू शकत नाही. मी राज्य आणि केंद्रातील काम मी करू शकतो. पण काही लोकांचं असं नाही, म्हणत पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
शेतामध्ये एआय तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेमध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये एआय तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला. पिकांसाठी एआय तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. ते आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा वापर करून उत्पादन वाढीला चालना तर मिळणार आहे. त्याचबरोबर त्यामुळे पाण्याची बचतदेखील होणार आहे. त्यामुळे लोकांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. गरज पडली तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून या तंत्रज्ञानासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं म्हणत अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी शेतामध्ये तंत्रज्ञान वापरण्याचं आवाहन केलं आहे.
फोटो काढून प्रश्न सुटत नाहीत -मी तुमची विकासाची कामे करण्यासाठी निवडून येतोय. विकासात कुठे कमी पडलो जाब विचारा. बारामतीला 1 हजार कोटी रुपये विकासासाठी आणले आहेत. काही लोक जाईल तेथे फोटो काढतात. ते सोशल मीडियावर टाकतात. केवळ फोटो काढून प्रश्न सुटत नाहीत, असे म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय. केवळ संचालक मंडळाची भेट घेतल्यानं शेतकऱ्याला जादा दर मिळत नाही. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमध्येदेखील वजन असावे लागते, असे म्हणत अजित पवार यांनी खासदार सुळे यांना नाव न घेता टोला लगावला.
शरद पवारांचं नाव न घेता टीका- कारखान्याच्या इन्कम टॅक्सच्या प्रश्नावरून अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच कौतुक केलं. तर स्वतःच्या काकांवर (शरद पवार) यांनी नाव न घेता टीका केली. कारखान्याच्या इन्कम टॅक्सचा प्रश्न अमित शाह यांच्यामुळे मिटला. काहींना अनेक वर्ष प्रश्न सोडवता आला नाही. त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत भावनिक होऊ नका, असे म्हणत अजित पवार यांनी प्रथमच शरद पवार यांच्यावर नाव न घेता थेट टीका केलीय. माळेगाव सहकारी साखर कारखाना अगोदरच्या काळात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत होता. ही काळ्या दगडावरची पांढरी आहे. हे मी नाकारत नाही, असेही अजित पवार म्हणालेत.
छत्रपतीं शिवरायांचं राज्य हे रयतेचं राज्य- देशात अनेक वेगवेगळे राजे होते. त्यांच्या नावानं ओळखलं जाते. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे नेहमीच जनतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं, असे अजित पवार यांनी म्हटलंय. त्याच पद्धतीनं राज्यकारभार आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही करत आल्याचं त्यांनी म्हटलय. आदिलशाही, निजामशाही अशा शाह्या त्यांच्या नावानं ओळखल्या जात होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखले जातं. कारण ते जनताभिमुख होते. आज आम्हीदेखील त्याच विचारांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा-