मुंबई - राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सुप वाजले. आम्ही जनतेचे प्रश्न मांडले. मात्र, सरकारनं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्द्यांवर बोलू दिले नाही. एकीकडे संविधानाच्या गप्पा मारायच्या तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याची निवड होत नाही. या अधिवेशनातून जनतेला काहीही मिळाले नाही, अशी टीका (Maharashtra Politics) विरोधकांनी केली.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी म्हटले, अधिवेशनात सत्तेचा माज दिसला. सरकारनं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी आमचा आवाज थांबविण्याचा प्रयत्न झाला. काही मुद्द्यांवर बोलू दिलं नाही. विरोधी पक्षनेत्याची अद्याप निवड झालेली नाही. एकीकडे संविधानाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. लोकशाहीची पायमल्ली होत आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली. मुख्यमंत्री उत्तम भाषण करतात. जागतिक पातळीवर स्पर्धा झाली, तर त्यात मुख्यमंत्र्यांचा नंबर येईल, असा टोलाही पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही मंत्र्यांचे गैरव्यवहार, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न असेल किंवा नागपूर दंगलीचा विषय असेल, हे सर्व मुद्दे मांडले. सत्ताधारी पक्षाचे सदस्य प्रथमच वेलमध्ये उतरले. असे पहिल्यांदाच घडले आहे. या राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकार काही बोलायला तयार नाही. याऐवजी सरकारनं भावनिक मुद्द्यांना हात घातला, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सत्ताधारी पक्षानंच कामकाज रोखण्याचं काम केलं. विरोधक संख्येनं कमी आहे, तर सरकार का घाबरले, असा सवालही दानवे यांनी यावेळी केला.
- हे अधिवेशन म्हणजे, कबरीपासून कामरापर्यंत होते, अशी सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत विरोधकांचा हल्लाबोल - या अधिवेशनात विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची घोषणा अध्यक्षांकडून करण्यात येईल, अशी विरोधकांना अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यावर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितलं, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे. महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून मी या अधिवेशनातून बाहेर पडेल, असे मला वाटलं होतं. मी आक्रमक आहे, म्हणून माझी अडचण वाटत असते. मी संयम पाळला. मात्र, मी नको असेल तर दुसऱ्या कोणाला करा. मी माझे पत्र मागे घेतो. मात्र, ज्यांना संविधान माान्य नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी, अशी टीका भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर केली.
हेही वाचा-