मुंबई : २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा जीडीपी देशात सर्वात जास्त म्हणजे ४५ लाख ३१ हजार कोटी आहे. २५-२६ मध्ये अंदाजे राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ कोटी म्हणजे २.७६ टक्के म्हणजे ३ टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळं कोणत्याही नियमांचं उल्लघंन झालेलं नाही, दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. तसंच, काम करणाऱ्यांना पुन्हा सत्ता दिली, तर घरी बसणाऱ्यांना घरी बसवलं, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव उथळ होता, केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. महायुतीची दुसरी इनिंग सुरु आहे. प्रत्येक कामात रिझन देणाऱ्यांचा सीझन महाराष्ट्राने संपवल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केलीय. अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला विधान परिषदेचे सभागृह नेते असलेल्या शिंदे यांनी उत्तर दिलं. यावेळी आमची पाच वर्षांची टेस्ट मॅच असली तरी आमची बॅटिंग २०-२० प्रमाणे होत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
महायुती सरकारची दमदार कामगिरी सुरु झालीय : "राज्यात पायाभूत सुविधांची १० लाख कोटी पेक्षा जास्तीची कामे सुरु आहेत. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस, ग्रोथ इंजिन आहे. एमएमआर रिजनमध्ये जगातील सर्वात मोठं मेट्रोचं नेटवर्क होतंय. हवाई नेटवर्क, रस्त्यांचे नेटवर्क, बंदरांचे नेटवर्क यांची कनेक्टिव्हिटी वाढवली जातेय. यामुळं उद्योजक मोठ्या संख्येनं येतील, पर्यटकांची संख्या वाढेल. आमची कनेक्टिव्हिटी सामान्य नागरिकांशी आहे. नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन राज्य सरकारच्या माध्यमातून विकसित केले जातंय. नदी जोड प्रकल्पाला प्राधान्य दिले जातंय. पुढील पाच वर्षांत काय करणार याचा रोडमॅप पहिल्या १०० दिवसात तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पुढील पाच वर्षांत करण्यात येईल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधक आमच्यामध्ये भांडणं लागण्याची वाट बघत आहेत, मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. महायुती सरकारची दमदार कामगिरी सुरु झालीय. आम्ही दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार असून आमचं सरकार प्रगतीचं, समृद्धीचं आहे. तर स्थगितीचं सरकार महाविकास आघाडीचं होतं", असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
सब काळ सारखा नसतो हे सपकाळांना सांगायची गरज : पुढं एकनाथ शिंदे म्हणाले, "देशातील दुसऱ्या क्रमाकांची लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. जीडीपीमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यावर इतर राज्यांच्या तुलनेत कमी कर्ज आहे. तामिळनाडूवरील कर्ज ८.३ लाख कोटी आहे, तर महाराष्ट्राचे कर्ज ७.२ लाख कोटी आहे. गेल्या पाच वर्षांत मध्यप्रदेशची कर्ज घेण्याची वाढ ११५ टक्के होती, कर्नाटकची १०९ टक्के, तामिळनाडूची कर्जवाढ १०८ टक्के तर महाराष्ट्राची कर्जवाढीचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे ६५ टक्के आहे. जीडीपीच्या तुलनेत कर्ज घेण्याचे प्रमाण १८.६ टक्के आहे, हे सर्वात कमी आहे. कर्नाटकात २४ टक्के, पश्चिम बंगाल ३९ टक्के आहे", असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच, "विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर विरोधक चिंतन करतील, असं मला वाटलं होतं. कॉंग्रेसने नाना पटोलेंचं पद काढून घेतलं व सपकाळांना खुर्ची दिलीय. मात्र नाना बरे होते, असं म्हणायची वेळ सपकाळांनी आणलीय. सब काळ सारखा नसतो हे सपकाळांना सांगायची गरज आहे", असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टोला लगावला.
कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल : "मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना काही शहाणपणा आलं असेल तर चांगलं आहे. गद्दार कोण याचा निर्णय न्यायालयानं व जनतेच्या न्यायालयानं दिलाय. कितीही सुपाऱ्या देऊन बदनामीची मोहीम चालवली तरी काही फरक पडणार नाही. संविधानाच्या व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता, मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारहाण केली, खोट्या केसेस उभ्या केल्या, तेव्हा कुठं संविधान होतं", असा परखड सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तसंच, "ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना संविधान आठवलं नाही का?" असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. याशिवाय, "कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, असं चाललंय" म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
मुंबईतील डांबरका सांबार कोणी खाल्लं? : मुंबईतील रस्ते कॉंक्रिटीकरणामुळं अनेकांच्या पोटात जळजळ होतेय, अशी टीक करत एकनाथ शिंदे म्हणाले, "मुंबईत ७०१ किमी क्रॉकिटच्या रस्त्याचे काम सुरु केलंय. यामुळं पुढील २०-२५ वर्षे रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार नाही. दुरुस्तीच्या नावावर साडेतीन हजार कोटी रुपये मलिद्याच्या स्वरुपात वाया गेले. काही जणांचा जीव मुंबईतील रस्त्यांमध्ये आहे. गेल्या २०-२५ वर्षांत मुंबईतील डांबरका सांबार कोणी खाल्लं", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच, सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्तीमुळं हे हाल झाले. कचऱ्यातून निर्माण झालेल्या एनर्जीचा हाय व्होल्टेज शॉक बसला. त्यातून काही अद्याप सावरलेलं नाही. बाळासाहेबांची शिवसेना डस्ट बीनमध्ये टाकली, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केला", असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
कर्तव्यदक्ष पोलिसांच्या मागे सरकार ठामपणे उभे : याचबरोबर, "महिलांना निर्भयपणे वावरता यावं, ही आमची भूमिका आहे. पोलिसांना बदनाम करण्याचा, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी सरकार सक्षम आहे. कर्तव्यदक्ष पोलिसांच्या मागे सरकार ठामपणे उभे आहे", अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिलीय. तसंच, "संविधानाच्या मार्गावर आता राज्याची दमदार वाटचाल सुरु असून आता ही वाटचाल थांबणार नाही. कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा बीमोड करुन महाराष्ट्र आपला अश्वमेधाचा घोडा घेऊन यशाच्या शिखराकडे निघाला आहे. महाराष्ट्रात आता विकासाची नवी पहाट उगवत असून त्याच्या स्वागताला आपण दोन्ही हात पसरुन उभं राहू या. एकदिलानं एक मतानं हा महाराष्ट्र वेगात पुढे नेऊया", असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.
हेही वाचा :
- 'कुणाल कामरानं गाणं लिहिलं तर शिंदे गँगला मिरची लागली'; संजय राऊतांचा हल्लाबोल
- "हे कसलं मोदींचं हिंदुत्व? एकिकडं औरंगजेबाची कबर अन्...", हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
- अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड; विरोधी पक्षनेतेपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...