ETV Bharat / state

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; 'या' जिल्ह्यांना यलो, ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारपासून पुन्हा धो धो पाऊस बरसणार आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 18, 2025 at 2:17 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये पावसानं धडक दिली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज हवामानाचा कल काय आहे, जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता : महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल झाला आहे. त्यामुळं राज्यात विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी आणि गुरूवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर 20 आणि 21 जूनला हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खबरदारी घेण्याचा सल्ला : पश्चिम घाटात, पुणे आणि सातारा इथं सलग चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस आणि त्यानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर नाशिक घाटात बुधवारी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे आणि नंदुरबारसह या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीनं शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी, विशेषतः सखल आणि पूरग्रस्त भागात खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज : 24 जूनपर्यंत सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात आठवडाभर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसामुळं दिल्ली विमानतळावर व्यत्यय : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. पावसामुळं किमान 14 उड्डाणे वळवण्यात आली. तर 400 हून अधिक उड्डाणे उशिरा झाली. मुसळधार पावसामुळं नव्यानं नूतनीकरण केलेल्या टर्मिनल 1 मधील ड्रेनेजची समस्या देखील समोर आली. तिथं छोट्या छतावरून पाणी फूड कोर्ट परिसरात शिरलं. विमानतळ संचालक, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (DIAL) ने छतावरील ड्रेनेज ओव्हरफ्लोमुळं ही घटना घडल्याचं कारण दिलं. यासह पावसाळ्यापूर्वी सुधारणात्मक उपाययोजना सुरू असल्याचं आश्वासन दिलं.

हेही वाचा :

  1. सिद्धगड किल्ल्यावरुन 1100 फूट खोल दरीत पडला गिर्यारोहक: तब्बल 48 तासानं सापडला मृतदेह
  2. रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
  3. जून महिन्यामध्येच उजनी धरण 50 टक्के भरले, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण