हिंदी भाषेसाठी सरकारवर कुणाचा दबाव होता? जीआर रद्द होताच राज ठाकरेंचा सवाल
हिंदी भाषेच्या संदर्भात राज्य सरकारनं दोन जीआर मागे घेतले आहेत. या निर्णयानंतर मनसे नेते राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Published : June 29, 2025 at 8:00 PM IST
|Updated : June 29, 2025 at 8:07 PM IST
मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेसंदर्भातील दोन जीआर रद्द केल्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. या निर्णयाचं शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. ठाकरे हाच ब्रँड आहे. सरकारनं एकजुटीचा धसका घेतल्याचं म्हणतं राऊतांनी महायुतीला डिवचलं आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या समितीचा अहवाल काहीही येवो, आम्ही सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हटलं आहे.
सरकारकडून हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न का करण्यात येत होता? याबाबत राज ठाकरे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं, " इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेण्यात आला. सरकारनं २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही. कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेण्यात आली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं? यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे."
एकजुटीचा धसका सरकारनं घेतला- महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा प्रयत्न एकदाचा हाणून पाडण्यात आला. यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं अभिनंद. या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून आवाज उठवला होता. तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण झाली असती. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारनं घेतला असेल. पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 29, 2025
समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका-सरकारनं पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे. परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत. ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय. महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका. अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही, याची नोंद सरकारनं घ्यावी.
मराठी माणसं एकवटताना दिसल्याचा आनंद-मराठी माणसानं यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत. ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे. त्यांच्याशी त्यांना काही देणंघेणं नाही. बहुधा, त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला, तो पुन्हा दिसला पाहिजे. भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसल्याचा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे. मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन, अशा शब्दात राज ठाकरे यांनी जनतेचं अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा-

