कोल्हापूर : राज्यात शरद पवार आणि अजित पवार तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, असं वाटत नाही. मात्र, समाजासाठी आमचे सर्व पक्षांनी एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व करावं. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर, समाजाचं भलं होईल," असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आमच नेतृत्व कराव : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे एका कार्यक्रमानिम्मित कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पक्षाचा आणि विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसंच शरद पवार पक्ष आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना नेतृत्व करण्याची खुली ऑफर दिली.
कोण एकत्र येतील, हे सांगता येत नाही. मात्र, समाजासाठी आमचे सर्व पक्ष एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर हे नेतृत्व करणार असतील तर, मला मंत्रीपदाचीदेखील अपेक्षा नाही. मला मंत्रिपदापेक्षा समाज महत्त्वाचा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं वंचित बहुजन आघाडी पक्ष विसर्जित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं, अशी अटदेखील मंत्री आठवले यांनी सांगितलं.
आरपारची लढाई झालीच पाहिजे : पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्ध हे पूर्णपणे नाही, तर तात्पुरत थांबलं आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानं युद्ध थांबलं हे काही खरं नाही. मात्र, भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांना हाताशी धरून नागरिकांवर हल्ला केला. त्यामुळं 'ऑपरेशन सिंदूर' हाती घेऊन आम्ही दहशतवादी ठार केले. पाकव्याप्त काश्मीर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आरपारची लढाई झालीच पाहिजे, अशी माझी आणि पक्षाची मागणी आहे. हा आधीच भारत नाही, नवा भारत आहे. आम्ही आता ताकदवान आहोत. आम्ही पाकड्यांना घाबरत नाही," असं म्हणत रामदास आठवले यांनी पाकिस्तानला ठणकावलं.
निधी इतर ठिकाणी वळवू नये : राज्य सरकारची महत्वकांक्षी असलेल्या 'लाडकी बहिण योजने'ला निधी कमी पडत असल्यानं समाज कल्याण विभागाचा निधी वळवण्यात आल्यानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी नाराजी दर्शवली होती. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, समाज कल्याण विभागाला निधी कमी मिळतो. त्यामुळं या विभागाचा निधी इतर ठिकाणी वळवू नये. त्यामुळं संजय शिरसाठ यांनी ते वक्तव्य केलं असावं. कर्नाटक सरकारनं जसा कायदा केला तसा, कायदा महाराष्ट्र सरकारनं करावा,"
माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. राज्यात या निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्र लढवणार आहोत. यामध्ये आमच्या पक्षाला काही जागा मिळायला पाहिजेत, अशी माझी मागणी आहे. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. केवळ मला संधी मिळून चालणार नाही तर माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. महायुतीचं सरकार आल्यापासून अद्याप आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ, असं सांगितल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.
हेही वाचा :