नांदेड : ज्यांना महायुतीत राहायचं आहे, ते राहतील. ज्यांना महायुतीत राहायचं नसेल, ते बाहेर पडतील, असं विधान भाजपाचे नेते आणि मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केलं आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२१) अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर आले असता, त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना हा इशारा दिल्याचं सांगण्यात येतं. पाच वर्षे आमच्याकडे २३७ आमदार आहेत. आम्ही युतीत काम करतो, त्यामुळं ज्यांना युतीत राहायचं आहे, ते राहतील, ज्यांना नाही राहायचं ते बाहेर पडतील. मी आमदारांच्या नाराजीचा फारसा विचार करत नाही, असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.
तक्रार करणाऱ्या आमदारांनी याबाबत पडताळणी करावी : काही दिवसांपूर्वी तांडावस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाबाबत नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या तीन आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, "तांडावस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येतात. त्याला आम्ही मंजुरी देतो. तक्रार करणाऱ्या आमदारांनी याबाबत पडताळणी करावी. आमदारांनी हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे सोडवला पाहिजे. तसंच, हा प्रस्ताव आम्ही तयार करत नाही, हा प्रस्ताव जिल्ह्याधिकाऱ्यांकडून येतो. त्यामुळं आमदाराचा जो गैरसमज आहे की, आम्ही निधी उपलब्ध करून दिला नाही. तो चुकीचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जे प्रस्ताव पाठवले आहेत, ते प्रस्ताव आपल्या मतदारसंघातील आहे किंवा नाही, याची पडताळणी आमदारांनी केली पाहिजे. जे प्रस्ताव आमच्याकडे आले, त्याचा आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे", असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.
हा प्रश्न मला विचारून काय फायदा : याचबरोबर, आमदार तुषार राठोड यांना मागच्या वेळी एक कोटी नव्वद लाखाची कामे दिलेली आहेत. त्यांना पण प्रश्न विचारा, किती निधी आला होता? हे तर नवीन आमदार आहेत. आता त्यांचे प्रस्तावच अजून आले नाहीत, असंही अतुल सावे यांनी सांगितलं. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवेसना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अतुल सावे यांनी विचारलं असता, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या फॅमिलीचा प्रश्न आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये ते एकत्र येत असतील तर आनंद आहे, असं अतुल सावे यांनी सांगितलं. तसंच, शरद पवार आणि अजित पवार चौथ्यांदा एकत्र आले, याबद्दल विचारले असता, हा प्रश्न मला विचारून काय फायदा आहे. त्यांना विचारला पाहिजे, तुम्ही दोन्ही प्रश्न चुकीचे विचारले, असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :