मुंबई : चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाकडून ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा गुरूवारी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलीय. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यंदा अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना घोषित करण्यात आलाय. तर हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे.
चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार : मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रात दीर्घकाळ आपलं योगदान देणाऱ्या तसंच या क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन अशा गुणांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना राज्य शासनाच्या या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. या वर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक यासह दिला जातो. याचबरोबर, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.
स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार : हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. रोख रक्कम १० लाख रुपये या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगण यांना दिला जाणार आहे. रोख रक्कम ६ लाख रुपये या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. याचबरोबर, १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना घोषित करण्यात आला आहे. रोख रक्कम १० लाख, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कारांचे वितरण कधी? दरम्यान, हे सर्व पुरस्कार २५ एप्रिल २०२५ रोजी एन. एस. सी. आय. डोम, वरळी, मुंबई येथे एका भव्यदिव्य कार्यक्रमात होणार आहे. तसेच याव्यतिरिक्त संविधानाचे अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे सांगीतिक मानवंदना कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, या पुरस्कार सोहळा कार्यक्रमात गायक सुरेश वाडकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिलीय.
....त्यांच्या नावानं पुरस्कार मिळाला, आणखी काय हवंय? : दरम्यान, महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, "आयुष्यात ठरविलं होतं की कोणतेही पुरस्कार नकोत. जीवनगौरव झाल्यावर रिटायर्ड झाल्यासारखं वाटतं. पण, असा हा पुरस्कार आहे, त्यामुळं कामाला प्रोत्साहन मिळाल्यासारखं वाटतं. कारण, व्ही. शांताराम यांच्या नावानं पुरस्कार आहे. आपल्याकडं एवढे चित्रपट निर्माते झाले आहेत. पण, दादासाहेब फाळके यांनी देशात सिनेमा आणला. तर भारतभर व्ही. शांताराम यांनी चित्रपट पसरविला. त्यांच्यासारखा चित्रपट निर्माता होणं शक्य नाही. त्यांच्या नावानं पुरस्कार मिळाला. आणखी काय हवंय? त्यांनी मराठी आणि हिंदीत चित्रपट केले. व्ही. शांताराम यांनी माणूस, डॉ. कोटणीस असे चित्रपट केले. बोलायला माझी जीभ जड होते. या देशात सिनेमा आणणारे दोन मराठी माणसं आहेत", अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिलीय.
पुरस्कार मिळाल्यानं आनंद, महाराष्ट्र ही माझ्यासाठी कर्मभूमी : याचबरोबर, हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनीही प्रतिक्रिया दिलीय. "पुरस्कार मिळाल्याचं माहीत नाही. पण, पुरस्कार मिळणं ही आनंदाची बाब आहे. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा मोठा पुरस्कार मिळाल्यानं खरोखर आनंद आहे. महाराष्ट्र ही माझ्यासाठी कर्मभूमी आहे. माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. ४३ वर्षे येथे व्यतीत केली आहेत", असं अभिनेते अनुपम खेर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :
आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही; हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ-राज ठाकरेंचा इशारा
एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द होणार
धर्मदाय आयुक्तांनी 'त्या' १२ रुग्णालयांवर ठोस कारवाई करावी; महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मागणी