मुंबई- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, 2023-24 च्या पुरस्कारांची राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केलीय. शुक्रवारी 18 एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात या पुरस्कारांचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरव : माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. पॅरा ऑलिम्पिक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते अदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायस्वाल, यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. एकूण 89 पुरस्कारांची घोषणा क्रीडा मंत्री भरणे यांनी केलीय. पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपालांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित राहतील. त्याशिवाय अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणेदेखील उपस्थित राहणार आहेत. जीवन गौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये, शिवछत्रपती पुरस्करासाठी तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शकुंतला खटावकर जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी : राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा आणि त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. राज्यात वर्ष 2001 पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार दिले जातात. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्यात. 1979 ते 82 कालावधीत 106 राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल आठ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. 1978 मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
हेही वाचा :