रघुजीराजे भोसलेंची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला मोठं यश; लंडनमध्ये जिंकला लिलाव
लंडन येथे लिलावात निघालेली रघुजीराजे भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या 'फिरंग' पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट असा नमुना आहे.

Published : April 30, 2025 at 10:45 AM IST
|Updated : April 30, 2025 at 1:01 PM IST
नागपूर : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे सर संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजीराजे भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि.२९) यांनी दिली आहे. दरम्यान, अशाप्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची पहिलीच वेळ आहे.
ऐतिहासिक तलवारीसाठी ४७ लाख १५ हजारांचा खर्च : सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांना दूतावास संपर्क व कामाची जबाबदारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री आशिष शेलार यांनी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला आणि लिलाव जिंकला. यासाठी हातळणी, वाहतूक व विमा खर्चासह जवळपास ४७.१५ लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या नावाने एक इतिहास नोंद होईल असा हा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

अत्यंत धाडसी मराठा सेनानी : रघुजीराजे भोसले प्रथम (१६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक व छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते. रघुजीराजे भोसले यांची शौर्य आणि युद्धनीती पाहून छत्रपती शाहू महाराजांनी रघुजीराजे यांन 'सेनासाहिबसुभा' ही पदवी दिली होती. रघुजीराजे भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल,ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघुजीराजे भोसले त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगड, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला. तसेच, अठराव्या शतकातील अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजीराजे भोसले यांच्याकडे बघितले जाते. नागपूर भोसलेंच्या भौगोलिक सीमेत लोखंड व तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे तयार करण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहेत.
तलवारीची वैशिष्ट्ये : लंडन येथे लिलावात निघालेली रघुजीराजे भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या 'फिरंग' पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट असा नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी 'श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग' हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती, याकडे निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे. रघुजीराजे भोसले प्रथम यांची फिरंग तलवार अनेकार्थांनी अत्यंत महत्वपूर्ण आहे. बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्याच्या किंवा वापरकर्त्याच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्ये होती. या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजीराजे भोसले यांच्या तलवारीवर नावाचा लेख तसेच नक्षीकाम केलेले आहे.
मुख्यमंत्र्यांचे आभार - मुधोजीराजे भोसले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन आपली ऐतिहासिक धरोवर असलेली तलवार परत मिळवली आहे. याबद्दल भोसले कुटुंबीयांकडून मुख्यमंत्र्यांचे आणि आशिष शेलार यांचे आभार मानतो, असे मुधोजीराजे भोसले म्हणाले. तसेच, लवकरच या ऐतिहासिक तलवारीचे दर्शन सर्वांना घेता येईल, असे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, विखे पाटील यांच्यासह आणखी ५३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
- जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी स्वतंत्र धोरण निश्चित; महाराष्ट्रात गुंतवणूक वाढणार अन् स्थानिकांना रोजगार मिळणार
- प्रसिद्ध गायिका आशा भोसले साईचरणी नतमस्तक, जुन्या आठवणींना दिला उजाळा..

