ETV Bharat / state

बदलापूर एन्काउंटर प्रकरणी पोलीस महासंचालकांकडून नव्या एसआयटीची स्थापना

बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी एसआयटी तयार करण्यात आली आहे.

Court
मुंबई उच्च न्यायालय (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2025 at 7:39 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी एसआयटी तयार करण्यात आली आहे. याप्रकरणी नव्यानं गुन्हा दाखल करण्याची गरज नसून त्याच एफआयआरवर या एसआयटीनं तपास करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं जारी केले आहेत. याप्रकरणी उपलब्ध सर्व कागदपत्रं एसआयटीकडं सोपवण्यात आल्याची माहिती आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली एसआयटी काम करणार आहे.



एसआयटीमध्ये कोण-कोणते अधिकारी आहेत? : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तयार केलेली एसआयटी मीरा-भाईंदरचे अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करेल. यांच्यासह पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त, एक सहआयुक्त, दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील. यामधील एक नवी मुंबई पोलीस विभागातून असेल. यासह दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असणार आहे. या एसआयटीत डीसीपी आणि एक वरीष्ठ पोलीस निरीक्षक वगळता सर्व अधिकारी हे मुंबई पोलीस दलातून असतील, असं महासंचालकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय? : याप्रकरणी संबंधित पोलिसांवर नव्यानं गुन्हा दाखल करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांना राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. या एसएलपीवर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारनं दाखल केलेली एसएलपी स्वीकारत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला मोठा दिलासा देत तपास राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली होईल, असं स्पष्ट केलं आहे.



काय आहे प्रकरण? : बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काउंटर झाला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदेनं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्यानं 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्या आसपास झाडण्यात आल्या. त्यावेळी तिथं असलेले दुसरे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला, तर दुसरी शरीरावर लागली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला.



उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका : न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर दाखल सुमोटो याचिकेवर सुनावणी सुरु आहे. एखाद्या आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्यास नेमके काय करावं?, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही झाली आहे. तरीही याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. मुळात याप्रकरणात पोलिसांची भूमिकाच संशायस्पद आहे. हा एन्काउंटर बनावट असल्याच्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन अहवालात नोंदवण्यात आल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली आहे.

हेही वाचा -

  1. बदलापूर एन्काउंटर प्रकरण: नव्यानं गुन्हा दाखल करण्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाच्या आदेशात बदल
  2. बदलापूर एन्काउंटर प्रकरणी सहभागी पोलिसांविरोधात शनिवारपर्यंत गुन्हा दाखल करणार; उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून आश्वासन
  3. बदलापूर अत्याचार प्रकरण; शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या अध्यादेशाचा मसुदा न्यायालयात सादर